मुखेड उपजिल्हा रूग्णालयात कोरोना रुग्णाच्या नातेवाईकात शाब्दीक बाचाबाची होऊन एका नातेवाईकाने दुसऱ्या रुग्णाच्या नातेवाईकावर चाकूने वार करण्याचा प्रयत्न करून डॉक्टर व परिचारिकेलाही धमकी दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.

यासंदर्भात आदी बनसोडे यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे. तक्रारीनुसार दिनांक २० एप्रिल २०२१ रोजी गणेश नगर येथे राहणाऱ्या ३० वर्षीय भाऊसाहेब गायकवाड सायंकाळी पाच वाजता मुखेड उपजिल्हा रुग्णालयातील कोरोना वॉर्डात आला. यावेळी भाऊसाहेबने इतर कोरोना रुग्णाच्या नातेवाईकांशी वाद घातला. भाऊसाहेब आणि इतर रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. त्यावेळी बनसोडे व डाॅ. संतोष टाकसाळे, डाॅ. रश्मी, परिचारक मणिषा गायकवाड, अक्षय बेळगे, परिचारिका अंजाना नामटीके, वार्डबॉय यांनी मिळून भाऊसाहेबला का गोंधळ घालतोस अशी विचारणा केली. तसेच हा कोरोना वार्ड आहे असे समजूत घालत असताना भाऊसाहेबने डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सुद्धा शिवीगाळ करून हातात चाकू घेऊन हल्ला करण्याची धमकी दिली.

यावेळी उपस्थित नातेवाईकांनी भाऊसाहेबला पकडून त्याच्या हातातून चाकू काढून घेतला त्यामुळे मोठा अनर्थ टळला. हा सर्व प्रकार झाल्यानंतर सर्वच परिचारिका व कर्मचाऱ्यांनी मुखेड पोलीस स्टेशन गाठून रीतसर तक्रार दिली. दि. २० रोजी रात्री उशीरा फिर्यादी आदी बनसोडे यांच्या तक्रारीवरून आरोपी भाऊसाहेब गायकवाड यांच्या विरोधात कलम ३५३, ५०४, ५०६, ४५ प्रमाणे व कलम ४/२५ प्रमाणे पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे.

या घटनेची दखल घेत आरोग्य उपसंचालक डॉ एकनाथ माले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी उपजिल्हा रुग्णालयास दि. २१ रोजी दुपारी भेट देऊन सविस्तर माहिती घेतली.