विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीआधी जि. प. अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा ‘कार्यक्रम’ होणार असून, विधानसभेच्या निमित्ताने रंगलेल्या घडामोडी या निवडीमुळे काहीशा थंडावल्या आहेत. मात्र, जि. प. अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने राष्ट्रवादीत ताणाताणी सुरू असून, माजी राज्यमंत्री सुरेश वरपुडकर यांनी चिरंजीव समशेर यांच्या अध्यक्षपदासाठी सदस्यांची जमवाजमव सुरू केली असतानाच जिल्हाध्यक्ष विजय भांबळे यांनी या पदासाठी जि. प. सदस्य राजेश विटेकर यांच्या नावाचा ‘व्हिप’ बजावला आहे.
राष्ट्रवादीअंतर्गत वरपुडकर विरुद्ध भांबळे संघर्ष जुनाच आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईत झालेल्या मुलाखतीतही खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर या दोन्ही स्थानिक नेत्यांच्या समर्थकांनी हुल्लडबाजी केली. वरपुडकर यांचे चिरंजीव समशेर सध्या जि. प.चे उपाध्यक्ष आहेत. त्यांना अध्यक्षपदी विराजमान करण्यासाठी वरपुडकरांनी प्रयत्नांची पराकाष्टा चालवली आहे. त्या दृष्टीने सदस्यांची जुळवाजुळव सुरू आहे. राष्ट्रवादीतील विजय भांबळे व आमदार बाबाजानी यांचाही गट सक्रिय झाला आहे. शिवसेना अजून काय भूमिका घेते हे स्पष्ट नसले, तरी या निवडीत कोणताही शिक्का लागू नये म्हणून आपल्या सदस्यांना तटस्थ राहण्याचा आदेश शिवसेना देईल, असे संकेत आहेत. गेल्याच आठवडय़ात वरपुडकर, आमदार रामप्रसाद बोर्डीकर, खासदार संजय जाधव यांचे समीकरण जुळत असल्याचे वृत्त होते. तथापि शिवसेनेने या संदर्भात आपली भूमिका अजूनही स्पष्ट केली नाही.
वरपुडकर गटाच्या अध्यक्षपदासाठी हालचाली सुरू असतानाच भांबळे यांनी सोमवारी जि. प.चे गटनेते बाळासाहेब जामकर यांना सूचित करणारा ‘व्हिप’ सर्वच सदस्यांना बजावला. रविवारी (दि. २१) होणाऱ्या जि. प. अध्यक्षपद निवडणुकीत राजेश विटेकर यांना पक्षाने अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून नियुक्त केले असून, या निर्णयाबाबतची माहिती सर्व सदस्यांना सभागृहात द्यावी व पक्षाचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घ्यावी, असा पक्षादेश भांबळे यांनी बजावला आहे.
दरम्यान, अध्यक्ष निवडीच्या अनुषंगाने मोठय़ा घडामोडी सुरू असून रस्सीखेचीत मोठी आर्थिक उलाढालही होत असल्याची चर्चा आहे. जि. प.त राष्ट्रवादीचे २५ सदस्य असले, तरीही यात गटबाजीमुळे एकमत नाही. काँग्रेसचे ८, शिवसेना ११, घनदाट मित्रमंडळ ३, अपक्ष २, शेकाप १ व भाजप २ असे पक्षीय बलाबल आहे.