बाळावर उपचारास विलंब केल्याने हे बाळ मरण पावल्याच्या प्रकारानंतर संतप्त नातेवाईक व डॉक्टरांमध्ये जोरदार बाचाबाची व हाणामारी झाली. यामध्ये बाळाच्या आई-वडिलांसह चारजण जबर जखमी झाले. दरम्यान, नातेवाईकांनी मारहाण केल्याचा आरोप करीत रुग्णालयातील डॉक्टरांनीही अचानक संप पुकारला. या प्रकारामुळे रुग्णालयात तणावाची स्थिती निर्माण झाली. शहरातील घाटी रुग्णालयात पहाटे तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. मात्र, या बाबत पोलिसांत कोणतीही नोंद झाली नसल्याचे बेगमपुरा पोलीस ठाण्यातून सांगण्यात आले.
जालना येथील सुमय्या शेख रोनक (वय २५) ही महिला काही दिवसांपूर्वी घाटी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. रुग्णालयात प्रसूती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. तीन आठवडय़ांपूर्वी तिला रुग्णालयातून सुटी देण्यात आली. मात्र, ९ दिवसांपूर्वी बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी पुन्हा रुग्णालयात दाखल केले होते. बाळाजवळ त्याची आई, तर बाहेर वडील व त्यांचा मेव्हणा हे दोघे झोपले होते. पहाटे तीनच्या दरम्यान बाळाची प्रकृती पुन्हा बिघडली. या वेळी तेथे डय़ुटीवर असलेल्या डॉक्टर व परिचारिका यांचे बाळाच्या आईने लक्ष वेधले. परंतु त्यांनी काही उपचार न करता गुपचूप झोपा, असा दम भरला. परंतु बाळाची प्रकृती खालावली जाऊन बाळ बेशुद्ध झाले. त्यामुळे त्याच्या आईने पतीला ही बाब सांगितली. पतीने लक्ष वेधल्यावर डॉक्टरांनी तपासले असता बाळ मरण पावल्याचे निदर्शनास आले. या प्रकारामुळे रुग्णाचे नातेवाईक संतप्त झाले. त्यांची डॉक्टर व परिचारिका यांच्याशी बाचाबाची झाली. या वेळी इतर डॉक्टरही जमा झाले. या सर्वानी शेख दाम्पत्याला सीसीटीव्ही नसलेल्या खोलीत नेऊन बेदम मारहाण केली. त्यांना सोडविण्यास आलेल्या अन्य दोघांनाही चोप दिल्याचे शेख दाम्पत्याचे म्हणणे होते. ही बाब समजल्यावर रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात येऊन डॉक्टरांना मारहाण केल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होते. या प्रकारामुळे रुग्णालयात तणाव निर्माण झाला होता. मात्र, हे प्रकरण परस्पर मिटविल्याने या प्रकाराची पोलिसांत कोणतीही नोंद झाली नाही.