‘खान हवा की बाण’ असा प्रचार करीत प्रत्येक निवडणुकीत बालेकिल्ला अबाधित ठेवणाऱ्या शिवसेनेला आता मात्र िहदुत्ववादी मतांच्या विभागणीचा मोठा धोका आहे. त्यामुळे या प्रचारावर सेनेला बालेकिल्ला राखता येईल काय, यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
१९९० पासून सेनेचा भगवा परभणी मतदारसंघात सातत्याने फडकत आहे. मुस्लीमबहुल असलेल्या या मतदारसंघात मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण झाल्यानंतर सेनेला विजय आणखी सोपा जातो. सेनेचे उमेदवारही थेट तसा प्रचार करतात. स्टेडियम मदानावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या सभेतही पाथरीच्या उमेदवार मीरा रेंगे यांनी थेट ‘खान हवा की बाण’ अशी भाषा वापरत शिवसनिकांना चुचकारले. रेंगे यांची लढत बाबाजानी दुर्राणी यांच्याशी आहे. परभणी मतदारसंघातही सेना याच मुद्यावर लढत देते. या वेळी मात्र सेनेच्या बालेकिल्ल्याला मतविभागणीचा धोका आहे. ‘धनुष्यबाण’ िहदुत्ववादी मतांसाठी एकमेव पर्याय होता. परंतु महायुती फुटल्याने ‘कमळा’चा पर्यायही मतदारांना उपलब्ध झाला आहे. िहदूमतांचे विभाजन झाल्यास सेनेच्या बालेकिल्ल्याचा बुरूज ढासळू शकतो, अशी स्थिती आहे.
परभणी मतदारसंघात १९९० मध्ये सेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर हनुमंत बोबडे विजयी झाले. काँग्रेसने शमीम अहमद खान यांना उमेदवारी दिली होती, तर जनता दलाकडून विजय गव्हाणे िरगणात होते. खान व गव्हाणे या दोघांनी राजकीय भाषेत ‘धर्मनिरपेक्ष’ मतांचे विभाजन केले. त्या वेळी बोबडे यांनी खान यांच्याविरुद्ध तब्बल १२ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला. गव्हाणे व खान यांना मिळालेली मते ६५ हजार होती, तर बोबडे यांनी ४९ हजार मते मिळवली. या निवडणुकीपासून सेनेने हा प्रचार सुरू केला असे बोलले जात असले, तरी प्रत्यक्षात १९८५ मध्ये गव्हाणे यांनी याच मतदारसंघात विजयी होताना हाच ‘फॉम्र्युला’ वापरल्याचे लोक सांगतात.
बोबडेंच्या विजयानंतर परभणी मतदारसंघ सेनेचा बालेकिल्ला झाला. ऐन निवडणुकीच्या तोंडावर निर्माण होणारे भगवे वातावरण, तसेच बाळासाहेब ठाकरे यांची सभा हे समीकरण सेनेला विजयापर्यंत घेऊन जात होते. १९९५ लाही सेनेने येथे विजय मिळवला. त्या वेळी काँग्रेसने खान यांनाच उमेदवारी दिली होती. या वेळी खान यांनी ३७ हजार, तर सेनेच्या तुकाराम रेंगे यांनी ५७ हजार मते घेतली. रेंगे यांनी २० हजारांचे मताधिक्य घेतले असले, तरी सेनाविरोधी मतांचे मोठे विभाजन रेंगे यांना कामी आले.
या निवडणुकीत जनता दलातर्फे गणेश दुधगावकर रिंगणात होते. त्यांना १७ हजार, तर भारिप-बहुजन महासंघाच्या सूर्यकांत हाके यांना १६ हजार मते मिळाली. हे दोन उमेदवार िरगणात नसते, तर खान आमदारही झाले असते. या निवडणुकीत सेनाविरोधी मते विभागली. पण सेनेची ‘मतपेढी’ शाबूत राहिली. हळूहळू सेनेने या मतदारसंघावर आपला प्रभाव कायम ठेवला आणि धनुष्यबाण हे सेनेचे चिन्ह िहदुत्ववादी मतदारांच्या मनावर ठसले. १९९९ मध्ये पुन्हा रेंगे यांना आमदारकीची संधी मिळाली. काँग्रेसने या वेळी लियाकत अली अन्सारी यांना उमेदवारी दिली, तर विजय गव्हाणे यांनी राष्ट्रवादीकडून उमेदवारी केली. या निवडणुकीतही सेनाविरोधी मतांचे विभाजन झाले. रेंगे यांनी ५८ हजार मते घेत विजय संपादन केला. अन्सारी यांना ५१ हजार मते मिळाली. गव्हाणे यांनी २६ हजार मते घेतल्याने रेंगे यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. प्रत्येक वेळी समीकरणे बदलत गेली, तरी सेनेला राजकीय यश मिळत गेले. सेनाविरोधी मतांचे विभाजन झाल्याने व सेनेची मते एकगठ्ठा उमेदवाराच्या पारडय़ात गेल्यानेही सेनेचा विजय सुकर ठरला.
२००४ मध्ये सेनेने संजय जाधव यांना उमेदवारी दिली. या वेळी त्यांच्या विरोधात सेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या अशोक देशमुख यांना पक्षाने उमेदवारी दिली. या निवडणुकीत देशमुख यांना ६५ हजार, तर जाधव यांना ७५ हजार मते मिळाली. जाधव यांना पुन्हा २००९ च्या निवडणुकीत विजय मिळाला. याचे कारण विखार अहमद खान यांची बंडखोरी. या निवडणुकीआधी सेनेतून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या रेंगे यांना उमेदवारी देण्यात आली. एकीकडे ‘गद्दार’ विरुद्ध ‘निष्ठावंत’ असा होणारा प्रचारही सेनेसाठी फायद्याचा ठरला. समोर विखार अहमद खान यांची उमेदवारीही सेनेला नेहमीच्याच प्रचारासाठी फायदेशीर ठरली.
आता या निवडणुकीत चित्र बदलले आहे. काँग्रेसने इरफानुर रहेमान खान यांना उमेदवारी दिली, तर ‘एमआयएम’कडून सज्जूलाला िरगणात आहेत. अजूनही काँग्रेस उमेदवाराला सक्षम प्रचारयंत्रणा उभारता आली नाही. परिणामी मुस्लीम मतांचे ध्रुवीकरण सज्जूलाला यांच्या बाजूने झाले, तर सेनेला नेहमीसारखा प्रचार करता आला असता. पण भाजपने आनंद भरोसे यांना उमेदवारी दिली. भाजप रिंगणात नसता तर सर्व िहदुत्ववादी मते सेनेच्या राहुल पाटील यांच्या पारडय़ात गेली असती. पारंपरिक िहदुत्ववादी मतदाराला आता ‘कमळ’ हा पर्यायही उपलब्ध आहे. ही मते कमळाच्या दिशेने सरकली, तर सेनेच्या बालेकिल्ल्याला धोका होऊ शकतो.