औरंगाबाद जिल्हय़ातील तीन विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे भारतीय कम्युनिस्ट पक्षाने ठरविले आहे. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून राजेंद्र दर्डा यांच्या विरोधात डॉ. भालचंद्र कांगो तर मध्य व गंगापूर विधानसभा मतदारसंघातून अशफाक सलामी व राम बाहेती निवडणूक लढविण्यास उत्सुक आहेत. भाकपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक २४ जुलै रोजी मुंबई येथे होणार असून, त्या दिवशी या तीन उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असे रविवारी सांगण्यात आले.
  गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडी कर्मचारी, शेतमजूर व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या बैठका घेण्याचे सत्र कार्यकर्त्यांनी सुरू केले आहे. या नेत्यांनी विधानसभा निवडणुकांमध्ये उतरावे, अशी विनंती वेगवेगळय़ा युनियनने केली होती. त्यानुसार गंगापूरमधून राम बाहेती व औरंगाबाद मध्य मधून अशफाक सलामी यांच्या उमेदवारीबाबतचे ठराव राज्य कार्यकारिणीकडे पाठविण्यात आले आहेत. जिल्हास्तरावरील बैठक १४ जुलै रोजी होणार असून, त्यानंतर राज्य कार्यकारिणीसमोर उमेदवारीचे ठराव मान्यतेसाठी ठेवले जाणार आहेत. सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्वसामान्य जनतेच्या मनात रोष असल्याने तो भाकपच्या पाठीमागे उभा राहावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. डॉ. कांगो यांनी तर औरंगाबाद पूर्व मतदारसंघात जनसंपर्कही वाढविला आहे.