सातारा जिल्ह्यातील कराड रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेण्यात आल्यानंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. त्याला उत्तर देताना हसन मुश्रीफ यांनी किरीट सोमय्या फक्त साधन आहेत, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटील आहेत असा आरोप केला आहे. किरीट सोमय्या जे आरोप करत आहेत, त्यामागे भारतीय जनता पार्टीचं फार मोठं षडयंत्र आहे असे मुश्रीफ यांनी म्हटले होते. त्यावर आता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उत्तर दिलं आहे.

कायद्याची लढाई कायद्याने लढा कोल्हापूरी चपलेने लढू नका. ईडीला तोंड देणं कठीण आहे. तोंडाला फेस येईल. कारखान्यांमध्ये ज्या कंपन्यांमधून ९८ कोटी आले त्या कंपन्या कुठे आहेत यावर बोला. त्या कंपन्यांनी कोलकातामधून सेनापती घोरपडे कारखान्यात कशी गुंतवणूक केली त्यावर तुम्ही बोला. त्यामुळे मला मुश्रीफ यांना आवाहन करायचं आहे शांत डोक्याने काम करायचं असतं, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

चंद्रकांत पाटलांना भुईसपाट केल्याच्या मुश्रीफांच्या वक्तव्याबाबतही त्यांनी भाष्य केलं आहे. “पश्चिम महाराष्ट्रामध्ये फक्त कोल्हापूर येत नाही. सोलापूरमध्ये भाजपाचे दोन आमदार होते ते आता आठ झालेत. सांगली महापालिकेत महापौरपद दगाफटक्याने गेलं पण स्थायी समिती पुन्हा भाजपाकडे आली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हापरिषद आमच्याकडे होती. पण हे तीन पक्ष ५६ला मुख्यमंत्री ५४ ला उपमुख्यमंत्री आणि ४४ला महसूलमंत्री यातून कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद गेली,” असे उत्तर चंद्रकांत पाटलांनी मुश्रीफांना दिले आहे.