News Flash

करोनाकाळात लग्नसमारंभात हाणामारी

हाणामारीत जखमी झालेल्यांची आकडेवारी अजून समोर आली नाही.

वसई सकवार येथील घटना; प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन

वसई : करोनाकाळात वसई पूर्वेतील सकवार पाटीलपाडा येथे हळदीसमारंभात नाचताना दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. करोनाकाळात लग्नसमारंभ साजरे करण्यावर शासनाने निर्बंध घातले असतानाही नागरिकांची मोठी गर्दी जमल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

वसई पूर्वेतील सकवार गावच्या पाटीलपाडा येथे तुंबडा कुटुंबीयांतील सुनील तुंबडा याचे लग्नकार्य रविवारी १६ मे  रोजी होते. या लग्नसमारंभात त्याच्या आदल्या दिवशी हळदीचा समारंभ ठेवण्यात आला होता. या हळदीच्या कार्यक्रमाला शेकडोच्या संख्येने पाहुणे मंडळींनी गर्दी केली होती. या वेळी हळदीत उपस्थित असलेले नागरिक नाचत होते, तर या नाचाऱ्यांमध्ये काही जण मद्यधुंद स्थितीत होते. मध्यरात्री नंतर नाचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रूपांतर हे हाणामारीत झाले. अनेक जण एकमेकांच्या अंगावर धावून जात होते, तर काही जण एकमेकांना मारहाण करीत होते. काहींनी एकमेकांवर खुर्च्या उचलून फेकल्या.

या हाणामारीत जखमी झालेल्यांची आकडेवारी अजून समोर आली नाही. सध्या मारहाण सुरू असलेल्या प्रकारचा व्हिडीओ सर्वत्र प्रसारित होत आहे.

करोनाकाळात शासनाच्या नियमानुसार लग्नकार्यास २५ जणांची उपस्थिती व दोन तासांची वेळ ठरविण्यात आली आहे. परंतु या घटनेमुळे शासनाचे प्रतिबंधित नियम अक्षरश: पायदळी तुडविण्यात आल्याचे चित्र दिसून आले आहे. मोजक्याच लोकांची परवानगी असताना इतक्या मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित झालेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याप्रकरणी विरार पोलिसांनी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दिली आहे.

करोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात आतापर्यंत सहभागी असलेल्या नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. – सुरेश वराडे , वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विरार पोलीस ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:38 am

Web Title: fighting at a wedding in corona virus infection akp 94
Next Stories
1 रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कोटय़वधींची हानी
2 Coronavirus : राज्यात दिवसभरात ४८ हजार २११ रूग्ण करोनामुक्त; रिकव्हरी रेट ९०.१९ टक्के!
3 रायगड जिल्ह्याला तौते वादळाचा तडाखा ; चौघांचा मृत्यू ,५ हजार घरांची पडझड!
Just Now!
X