इचलकरंजी येथे झालेल्या होडय़ांच्या शर्यतीतील वादावादीनंतर सांगली जिल्ह्यातील समडोळी व कवठेपिरानमधील तरुणांच्या गटात शनिवारी रात्री मारामारी झाली. या मारामारीत १० ते १२ जण जखमी झाले असून जाळपोळीत तीन मोटारसायकली जाळण्यात आल्या आहेत. दोन्ही गावात रविवारी प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला आहे. मात्र या मारामारीप्रकरणी सायंकाळपर्यंत कोणाचीही तक्रार दाखल झालेली नाही.
    इचलकरंजी येथे क्रांतिदिनानिमित्त शनिवारी होडय़ांच्या शर्यती आयोजित करण्यात आल्या होत्या. या शर्यतीत सप्तर्षी बोटस क्लब कवठेपिरान या मंडळाचा दुसरा तर शानदार क्लब समडोळीचा तिसरा क्रमांक आल्याचे जाहीर करण्यात आले होते. तत्पूर्वी समडोळीच्या शानदार क्लबचा दुसरा क्रमांक आल्याचे जाहीर करण्यात आले असताना कवठेपिरानच्या तरुणांनी आयोजकांशी हुज्जत घालून दुसरा क्रमांक घेतला असल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.
    होडय़ांच्या शर्यती संपल्यानंतर गावी परतत असताना समडोळी नजीक असणाऱ्या लक्ष्मी फाटय़ावर दोन्ही गावातील तरुणांमध्ये वादावादी व मारामारी झाली. या मारामारीत लाठय़ा व दगडांचा वापर करण्यात आला. यात काही तरुण जखमी झाले आहेत. याच ठिकाणी तीन मोटारसायकली पेटवण्यात आल्या. आगीत मोटारसायकल जळून खाक झाल्या आहेत.
    ही घटना पोलिसांना समजताच तत्काळ कुमक दोन्ही गावाकडे रवाना करण्यात आली. आज सकाळपासून दोन्ही गावात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी बंदोबस्त तनात केला असून या मारामारीप्रकरणी तक्रार देण्यासाठी कोणीही पुढे आले नाही.
पोलिसांनी जळालेल्या मोटारसायकली ताब्यात घेतल्या असून सरकार पक्षातर्फे फिर्याद दाखल करण्याची तयारी सुरू आहे.
क्रिकेट खेळण्याच्या वादातून खून
 क्रिकेट खेळातील वादातून मित्राने केलेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा रविवारी सकाळी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. मित्राच्या खूनप्रकरणी संशयित तरुणाला न्यायालयाने १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
मिरजेतील भारतनगर परिसरात काल रात्री स्वनिल ऊर्फ बबलू दिलीप भोसले (वय २२) या तरुणावर त्याचा मित्र सोहेल अब्दुल मुल्ला (वय २२) याने चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात बबलू गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
त्याचा मित्र सोहेल याच्याशी क्रिकेट खेळत असताना वाद झाला होता. या वादावादीनंतर एकमेकाकडे रागाने बघत होते. यातूनच सोहेलने बबलूवर काल रात्री चाकू हल्ला केला. या घटनेनंतर पोलिसांनी रात्रीच सोहेलला ताब्यात घेतले होते. बबलूच्या मृत्यूनंतर त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून न्यायालयाने संशयित आरोपी सोहेल याला १६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
तरुणाचा हल्ल्यात मृत्यू झाल्याने भारतनगर परिसरात आज सकाळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अनुचित प्रकार घडू नये यासाठी भारतनगर, विद्यानगर, निमजगा माळ आदी ठिकाणी दिवसभर मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तनात करण्यात आला होता. पोलीस उपअधीक्षक बजरंग बनसोडे जातीने घटनास्थळी हजर होते. घटनेनंतर संशयित आरोपीला तत्काळ अटक केल्याने तणाव निवळला.