इचलकरंजी येथील डेक्कन रोडवर दुचाकी बाजूला घेण्याच्या कारणावरून दोन गटांत मोठी मारामारी झाली. या घटनेनंतर जमावाने इंडिका मोटारीची तोडफोड करून मोठे नुकसान केले. तसेच पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार घडला. या घटनेमुळे डेक्कन मिलसमोर सुमारे तासभर तणावाचे वातावरण होते. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले असून, घटनास्थळी हवेत गोळीबार झाल्याची चर्चा केली जात होती, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गोळीबार केला की नाही याबाबतची माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.    
याबाबत अधिक माहिती अशी, की इचलकरंजी येथील स्टेशन रोडवर डेक्कन मिल आहे. या मिलच्या परिसरात रहदारी असते. या मार्गावरून दिलीप जाधव दुचाकीस्वार जात होता. त्याच्या दुचाकीचा रामा पाटील यांच्या मोटारीला धक्का बसला. त्यामुळे पाटील आणि जाधव यांच्यात शाब्दिक वादावादी सुरू झाली. त्यातून दोघांनी एकमेकांवर येत मारामारी सुरू केली. जाधव याला मारहाण झाल्याचे समजताच जवळच असलेल्या गोसावी समाजातील लोक मोठय़ा संख्येने जमले. स्टेशन रोडवरील एका कार्यालयात दोघांच्यात समझोता सुरू असताना आक्रमक झालेल्या जमावाने मोटारीवर दगडफेक करून काचा फोडल्या. घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जमावाने पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रयत्न केला. तसेच घटनास्थळी जमावातून एकाने दशहत निर्माणकरण्यासाठी हवेत गोळीबार केल्याचे बोलले जाते.