यवतमाळ जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या

यवतमाळ जिल्ह्य़ातील घाटंजी तालुक्यातील टिटवी आणि राजूरवाडी येथील शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या प्रकरणी मोदी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी येथे केली आहे.

विखे यांनी माधव शंकर रावते आणि शंकर भाऊराव चायरे कुटुंबीयांची भेट घेतली. यवतमाळला आयोजित वार्ताहर परिषदेत त्यांनी मोदी सरकारवर टीका केली. यावेळी वामनराव कासावार, विजय खडसे, विजया धोटे हे काँग्रेसचे माजी आमदार, जि.प.चे माजी अध्यक्ष युवक काँग्रेसचे राहुल ठाकरे, शेतकरी न्याय हक्क आंदोलन समितीचे निमंत्रक देवानंद पवार हजर होते.

सावळेश्वर येथील ७६ वर्षीय शेतकरी माधव शंकर रावते यांनी १४ एप्रिल २०१८ ला पऱ्हाटीच्या गंजीला आग लावून त्यात उडी घेऊन आत्महत्या केली, असा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी १७ एप्रिलला दिला असताना माधवचा मृत्य ूअपघाती आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न सरकारी यंत्रणा करीत आहे. प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी विखे यांनी केली.

राजूरवाडी आणि टिटवीतील शेतकऱ्यांच्या आत्महत्या सरकारबद्दल चीड निर्माण करणाऱ्या आहेत. मात्र, केंद आणि राज्य सरकार असंवेदनशील आहे. सरकारचे अपयश झाकण्यासाठी आत्महत्यांना अपघाती मृत्यू ठरवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप त्यांनी केला.

शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसून सरकारी धोरणामुळे झालेल्या हत्याच आहेत, असा आरोप विखे यांनी केला. इतक्या कोडगेपणाने वागणारे सरकार आतापर्यंत आपण पाहिले नाही, खून करून पुरावे नष्ट करणाऱ्या इंद्राणी मुखर्जी, अभय कुरुंदकर, युवराज कामटे आणि युती  सरकार एकाच माळेचे मणी असल्याचा आरोपही त्यांनी केला.

मृतांच्या कुटुंबीयांना मदत

सावळेश्वर येथील माधव रावतेच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश विखे पाटलांनी दिला. राजूरवाडीच्या शंकर चायरेच्या मुलींच्या पदव्युत्तर शिक्षणाची व लग्न लावून देण्याची जबाबदारी त्यांनी उचलली. चायरे आणि मानगावकर कुटुंबीयांनाही प्रत्येकी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली.