साक्री तालुक्यातील चिकसे येथील शेतकऱ्याच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याप्रकरणी पिंपळनेर पोलिसांनी गटविकास अधिकारी सारिका बारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मयत शेतकरी लक्ष्मण बर्डे (७०) यांचे पुत्र दीपक यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. गटविकास अधिकारी बारी यांनी ३ मार्च रोजी वडिलांशी अरेरावी केल्याचे दीपक यांचे म्हणणे आहे. गारपीटग्रस्त शेतीचे पंचनामे करताना वडिलांवर शेतीचे नुकसान झाल्याची चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करून गुन्हा दाखल करण्याची धमकी गटविकास अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे मनस्ताप करून घेत वडिलांनी गळफास घेतल्याचा आरोप दीपक बर्डे यांनी तक्रारीत केला आहे. या संदर्भात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आत्महत्येस बारी या जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी गावातील रहिवाशांचे म्हणणे नोंदवून घेतले. त्या माहितीवर जिल्हा सरकारी अभियोक्त्यांचा अभिप्राय मागविण्यात आला. अभिप्राय मिळाल्यानंतर पोलिसांनी बारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.