नांदगाव तालुक्यातील शेतजमीन खरेदी व्यवहार नियमित करणे तसेच फौजदारी कारवाई टाळण्यासाठी ३५ लाखाची लाच मागितल्याप्रकरणी येथील अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र पवारला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतले. या कारवाईनंतर एकाच वेळी पवारचे शासकीय तसेच नाशिक व मूळ गाव श्रीगोंदा येथील खासगी निवासस्थानांवर छापे टाकून झडतीसत्र सुरू करण्यात आले. गेल्या फेब्रुवारी महिन्यात प्रांताधिकाऱ्यासह दोघांना सव्वा दोन लाखाची लाच घेताना पकडण्यात आले होते. ही घटना ताजी असतानाच अपर जिल्हाधिकाऱ्यासारख्या आणखी एका बडय़ा अधिकाऱ्यावर लाचप्रकरणी कारवाई झाल्यामुळे महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
नाशिकचे रहिवासी असलेले या प्रकरणातील तक्रारदार व त्यांच्या नातेवाईकांनी नांदगाव तालुक्यातील गणेशनगर व गंगाधरी येथे ७५ एकर ८५ गुंठे शेतजमीन खरेदी केली होती. या व्यवहारातील त्रुटी दर्शवत मे महिन्यात अपर जिल्हाधिकारी कार्यालयाने संबंधितांना फौजदारी कारवाई का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती. दरम्यानच्या काळात दिनेशभाई पंचारसा (रा. नाशिक) नावाची व्यक्ती तक्रारदारास भेटली. पवार यांनी आपणास धाडल्याचे सांगून जमीन व्यवहार नियमित करण्याबरोबर फौजदारी कारवाई टाळण्यासाठी पंचासराने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. या मध्यस्थामार्फत पवारने ५० लाखांची मागणी केली होती. तडजोडीअंती ३५ लाखात कारवाई टाळण्याचे आणि जमीन खरेदी व्यवहार नियमित करून देण्याची हमी देण्यात आली.
या संदर्भात तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली होती. पवारने प्रत्यक्षात लाच स्वीकारली नाही. परंतु मध्यस्थ पंचारसामार्फत ३५ लाखाची लाच मागितल्याचे तपासात निष्पन्न झाले. पथकाने शासकीय निवासस्थानातून पवारला ताब्यात घेऊन नाशिकला नेले. पंचासरालाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी नाशिकच्या भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.