25 February 2021

News Flash

मंत्रालयातील धक्कादायक प्रकार! मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईलमध्ये फेरफार; चौकशीचा आदेशच फिरवला

मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (संग्रहित छायाचित्र)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर फेरफार करत आदेशच फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. या फाईलमधील मजकूर मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदलण्यात आला. ही बाब समोर आल्यानंतर मंत्रालयात खळबळ उडाली असून, याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी त्या संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीनंतर या फाईलमधील मजकूर परस्पर बदलण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर स्वाक्षरीच्या वरच्या भागात लाल शाईने एक अतिरिक्त मजकूर लिहण्यात आला. त्यामध्ये संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी, असा शेरा लिहिण्यात आला होता. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयात मुख्यमंत्र्यांची परवानगी अंतिम असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरी महत्त्व असतं. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर शेरा बदलण्याचं धाडस मंत्रालयातच कुणीतरी केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

शिवसेना-भाजप युतीचं सरकार असताना जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधील बांधकामात अनियमितता झाल्याच्या कारणावरून सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक अभियंत्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यामध्ये फेरफार करण्यात आलेल्या फाईलमधील अधीक्षक अभियंता नाना पवार यांचाही समावेश होता. नाना पवार हे त्यावेळी कार्यकारी अभियंता होते.

असा समोर आला शेरा बदलल्याचा प्रकार?

महाविकासआघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चौकशीची ही फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली होती. मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर फाईल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे परत आल्या. मुख्यमंत्र्यांना चौकशी करण्याचा प्रस्ताव पाठवलेला असताना मुख्यमंत्र्यांनी चौकशी बंद करण्याचा आदेश देण्यात आल्याच पाहून अशोक चव्हाण यांना धक्का बसला. मुख्यमंत्र्यांनी अन्य अभियंत्यांच्या चौकशीला हिरवा कंदील दाखवला होता. मात्र, त्यामधून नाना पवार यांचे नाव वगळले होते.

मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या अत्यंत छोट्या जागेत हा शेरा कसाबसा लिहला होता. एरवी मुख्यमंत्री सही करताना मजकुर आणि सहीमध्ये पुरेशी जागा सोडलेली असते. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या मनात फाईलवरील शेऱ्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यामुळे चव्हाण यांनी ही फाईल पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठवली. मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या फाईल स्कॅन करून ठेवल्या जातात. त्या प्रतींची तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरच्या भागात असा कोणताही शेरा मुख्यमंत्र्यांनी लिहला नसल्याचं उघड झालं. मुख्यमंत्र्यांनी नाना पवार यांच्या चौकशीसाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे संबंधित फाईलमध्ये कोणीतरी परस्पर फेरफार केल्याचे निष्पन्न झालं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 24, 2021 9:49 am

Web Title: file tampered which signed by maharashtra chief minister uddhav thackeray bmh 90
Next Stories
1 ‘विवा’ होम्सच्या मेहुल ठाकूर यांना अटक
2 साताऱ्यात पिसाळलेला कुत्रा चावल्याने दोघांचा मृत्यू
3 राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंना पक्षप्रवेशासाठी १०० कोटींची ऑफर? भाजपा नेत्याने दिलं खोचक उत्तर
Just Now!
X