चित्रफित समाज माध्यमावर प्रसारित

यवतमाळ : पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर अभयारण्यातील एका वाघिणीने बछडय़ांसह आपल्या सीमेबाहरे येत सुन्ना शिवारातील शेतात चरत असलेल्या बैलावर हल्ला चढवला. वाघिणीने हल्ला चढवल्यानंतर सोबतचे चार बछडे जवळपास फिरत असल्याने शेतातील मजूरही काही काळ गर्भगळीत झाले. हा थरार काही व्यक्तींनी मोबाईलमधील कॅमेऱ्यांत टिपून समाज माध्यमांवर प्रसारित केला.

टिपेश्वर अभयारण्यात वाघांचा मुक्त संचार आहे. पांढरकवडापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या सुन्ना गावात या अभयारण्याचे एक प्रवेशद्वार आहे. त्याच परिसरात अभयारण्यालगत प्रवीण बोळकुंटवार यांचे शेत आहे. बुधवारी शेतात काही महिला मजूर काम करीत होत्या. त्यांना दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास धुऱ्यावरून एक वाघीण चार बछडय़ांसह शेतात येताना दिसली. महिला बचावात्मक पवित्रा घेण्याच्या तयारीत असतानाच या वाघिणीने धुऱ्यावर चरत असलेल्या बैलावर हल्ला चढवला. अचानक झालेल्या या हल्लय़ाने बैल सैरभैर झाला तर महिला मजूरही भयभीत झाल्या. एका महिलने सुन्ना येथील शेतमालकास भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली.

शेतमालक प्रवीण बोळकुंटवार गावातील काही नागरिकांसह शेतात पोहोचले तेव्हा वाघीण बैलाच्या अंगावर झडप घालून त्याला ओरबडत असल्याचे दिसले. या नागरिकांनी वाघिणीस हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला मात्र धुऱ्यावर उभे असलेले चार बछडे पाहून सर्वानीच शेतातून घराकडे धाव घेतली. या हल्लय़ात बैल ठार झाला. शिकार केल्यानंतर मांस भक्षणासाठी ही वाघीण गुरुवारी सकाळी पाच वाजताच्या सुमारास बछडय़ांसह शेतात आल्याची माहिती शेतमालक प्रवीण बोळकुंटवार यांनी दिली. या हल्लय़ामुळे अभयारण्यालगतच्या सुन्ना व इतर गावांमध्ये दहशत पसरली आहे.

दरम्यान, बोळकुंटवार यांचे शेत अभयारण्यालगतच असल्याने ही वाघीण बछडय़ांसह शेतात शिरली असावी. वनविभागाने घटनास्थळी पंचनामा केला. शेतमालकास हल्लय़ात ठार झालेल्या बैलाची नुकसान भरपाई मिळावी यासाठी शुक्रवारीच वरिष्ठांना प्रस्ताव पाठवल्याची माहिती पांढरकवडा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी विक्रांत खाडे यांनी ‘लोकसत्ता’स दिली. या परिसरात नागरिकांनी सध्या जाऊ नये, यासाठी सतर्क करण्यात आले आहे. भविष्यात अभयारण्यालगत असलेल्या शेतीच्या भागात तारेचे कुंपण करण्याचा प्रस्ताव असल्याचेही खाडे यांनी सांगितले.