एका मालिकेच्या सेटवर ओळख झाल्याचा फायदा उठवीत त्रिकुटाने चक्क एका सिनेदिग्दर्शकास २ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. यामध्ये आरोपींनी दूरदर्शनवरील मालिकांमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून त्याची फसवणूक केली. याप्रकरणी ओशिवरा पोलीस ठाण्यात त्रिकूटावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चिंटू रतनलाल बिहानी याला अटक केली आहे. मात्र त्याच्या सोबतचे दोन जण अद्याप फरार आहेत. आरोपी चिंटूला मंगळवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. अन्य दोघांची नावे मोना चिंटू बिहानी आणि धर्मेंद्रकुमार अरोरा अशी आहेत.

याप्रकरणी मोहब्बत आलम खान या मालिका दिग्दर्शकांनी तक्रार दाखल केली आहे. ते गोरेगावमध्ये आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात. त्यांच्या स्वतःच्या नावाने तीन कंपन्या असून त्यांची कार्यालय अंधेरी लोखंडवाला मार्केट येथे आहेत. जून २००९ रोजी संजय मुखर्जी तयार करीत असलेल्या मलिकाच्या सेटवर आरोपी चिंटू, मोना आणि धर्मेंद्रकुमार यांची ओळख झाली. चिंटू बिहानी हा दूरदर्शनसाठी एजंट म्हणून काम करीत होता. त्याच्यावर डीडी-१, आणि डीडी-उर्दू वर मालिका प्रसारित करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. दरम्यान भेटीत मोहब्बत खान यांना चिंटू, मोना आणि धर्मेंद्र कुमार यांनी मालिकांमध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे राहील असा सल्ला दिला. चिंटूने डीडी मुरडूमध्ये तब्बसूम नावाची मालिका प्रसारित केल्यास चांगला नफा मिळेल असे सांगितले. चिंटूचा प्रस्ताव मोहब्बत खान यांना पटला त्यांनी गुंतवणुकीला दुजोरा दिला. ५ जून २००९ साली खान त्यांच्या कंपनीने संबंधित मालिकांचे दिग्दर्शक अलोक शेठ यांच्याशी करार करून हक्क मिळवले होते. या करारानुसार अलोक शेठ यांना ९ लाख रुपये देण्यात आले. यावेळी चिंटू, मोना आणि धर्मेंद्र कुमार हेही उपस्थित होते.

मालिकांचे काम झाल्यानंतर अलोक शेठ, तिन्ही आरोपी आणि तक्रारदार मोहब्बत खान हे दिल्लीत मालिका सादर करण्यासाठी गेले होते. त्याचवेळी चिंटूने संजय शर्मा नावाच्या इसमाची ओळख काढली. शर्मा हे सेक्शन अधिकारी असल्याचे सांगितले. ९० दिवसात गुंतवणूक केलेली रक्कम परत मिळेल असे सांगण्यात आले. काही दिवसाने पुन्हा दिल्लीत गेल्यानंतर त्रिपुरा शर्मा यांची भेट चिंटूने घेतली. त्यावेळी तब्बसूम नावाची मालिका सबमिशन झालीच नसल्याचा गौप्य्स्फोट झाला. त्यांच्याकडे असलेली पावती ही बनावट असल्याचे अधिकारी त्रिपुरा शर्मा यांनी सांगितले. तक्रारदार मोहब्बत खान यांनी चिंटुकडे पैशाची मागणी केली. चिंटूने त्यांना १४ लाख ५० हजारांचा धनादेश दिला. मात्र तो वठलाच नाही. मालिकेबाबत चौकशी केल्यानंतर मालिकेचे हक्क दुसऱ्याच व्यक्तीला विकले गेल्याचे लक्षात आले. अशाप्रकारे त्यांनी ऐसा भी क्यू होता है , मै क्यू चुप रहू, जंजिरे, गर्दिशे, तब्बसूम-२ या मालिकांमध्ये गुंतवणूक करण्यास भाग पडून या तिघा आरोपींनी मोहब्बत खान यांना जून २००९ ते जानेवारी २०१९ या कालावधीत विविध मालिकांमध्ये गुंतवणूक म्हणून २ कोटी रुपयांची फसवणूक केली.

मोहब्बत खान यांनी या फसवणुकीबाबत ओशिवरा पोलीस ठाण्यात लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. तक्रारीची शहानिशा करून ओशिवरा पोलिसांनी चिंटू बिहानी, मोना आणि धर्मेंद्रकुमार या तिघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर चिंटू बिहानी याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले असून चिंटूची पत्नी मोना आणि धर्मेंद्रकुमार यांचा पोलिस शोध घेत आहेत.