News Flash

हिंगणघाटमधील पीडितेच्या संघर्षाचा शेवट, शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते

हिंगणघाटमधील पीडितेचा संघर्ष अखेर थांबला असून शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. अंत्यसंस्काराआधी नातेवाईकांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याआधी मृतदेह स्वीकारण्यासही नकार देण्यात आला होता. मात्र गृहमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर तो स्वीकारण्यात आला.

हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना घडली होती. गेल्या सात दिवसांपासून पीडितेवर उपचार सुरू होते. डॉक्टरांचं विशेष पथक तरुणीवर उपचार करत होतं. मात्र, सोमवारी अचानक ह्रदयविकाराच्या धक्क्यानं तिचा मृत्यू झाला.

हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली होती. संतप्त नागरिकांनी यावेळी मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका अडवली होती. तसंच काहीजणांनी दगडफेकही केली. नागरिकांकडून पोलिसांना धक्काबुक्कीही करण्यात आली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ३०० पोलिसांचा फौजफाटा गावात तैनात आहे.

महाराष्ट्र दयामाया दाखवणार नाही, आरोपीला फासावर लटकवू – उद्धव ठाकरे
हिंगणघाट जळीतकांड प्रकरणातील आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. आरोपीला लवकरात लवकर शिक्षा होईल, गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे.

“आरोपीला कोणताही दया माया दाखवली जाणार नाही. या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करु. अनेकदा अशा प्रकरणांची न्यायालयात बराच वेळ सुनावणी सुरु असते. निकाल लागला तरी शिक्षा होण्यास वेळ लागतो. तसं या बाबतीत घडू देणार नाही. लवकरात लवकर गुन्हा सिद्ध करुन आरोपीला फासावर लटकवू,” असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी अशा पद्धतीचं कृत्य करण्याची हिंमत होणार नाही असा कायदा करु असं आश्वासनही दिलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 10, 2020 5:16 pm

Web Title: final cremation of hinganghat victim wardha sgy 87
Next Stories
1 मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने आई, वडील आणि भावाची आत्महत्या
2 हिंगणघाट जळीतकांड : रेणुका शहाणेंनी व्यक्त केला संताप
3 हिंगणघाट जळीतकांड: आरोपीला कठोरातली कठोर शिक्षा देणार-बाळासाहेब थोरात
Just Now!
X