तीस वष्रे पक्षात इमाने-इतबारे काम करूनही स्थानिक नेते वारंवार अपमानीत करीत असल्यानेच आपण काँग्रेस पक्ष सोडणार आहोत, असे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी स्पष्ट केले.
प्रत्येकी ३ वेळा खासदार व आमदार राहिलेल्या खतगावकर यांनी राज्यात मंत्रिपद भूषविले. लोकसभा निवडणुकीत ऐनवेळी कोणत्याही सबळ कारणाशिवाय त्यांची उमेदवारी कापण्यात आली. अशोक चव्हाण यांचे राजकीय पुनर्वसन होणार असल्याने खतगावकर यांनी मोठय़ा मनाने उमेदवारी नाकारली, परंतु चव्हाणांच्या प्रचारातही ते सक्रिय राहिले. चव्हाण यांच्या विजयानंतर पक्षात आपल्याला मान मिळेल, असे त्यांना वाटत होते. परंतु त्यांना दुर्लक्षित करण्यात आले. पक्षात होणाऱ्या अपमानाने गेल्या काही दिवसांपासून ते अस्वस्थ होते. समर्थकांच्या आग्रहानंतर ते पक्ष सोडणार काय? अशी चर्चाही गेल्या काही दिवसांपासून होती.
खतगावकर काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार, हे स्पष्ट झाल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या समर्थकांनी गेल्या दोन दिवसांपासून त्यांची मनधरणी सुरू केली. पालकमंत्री डी. पी. सावंत, आमदार ओमप्रकाश पोकर्णा व अमर राजूरकर यांच्यासह अनेकांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. यापकी काहींनी अशोक चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवर बोलण्याचा आग्रह धरला. मात्र, खतगावकरांनी स्पष्ट नकार दिला. काँग्रेस सोडणार की नाही, या बाबत त्यांनी कोणतेही जाहीर भाष्य केले नव्हते; परंतु शनिवारी या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी काँग्रेस सोडणार असल्याचे स्पष्ट केले. कोणत्या पक्षात जाणार, या बाबत मात्र कोणतेही भाष्य केले नाही. पक्षात आपली दमछाक होत आहे. वेळोवेळी अपमानित करण्यात येत आहे, त्यामुळेच पक्ष सोडत आहोत, असे ते म्हणाले.
रेल्वे दरवाढीसंदर्भात काँग्रेसने गेल्या महिन्यात केलेल्या आंदोलनाची त्यांनी खिल्ली उडवली. देशभरात जनतेने नरेंद्र मोदींचे नेतृत्व मान्य केले आहे. गेल्या ५०-६० वर्षांत काँग्रेसची सत्ता असताना अनेक वेळा रेल्वे दरवाढ झाली. तेव्हा दरवाढीचे समर्थन करताना आता विरोध कशासाठी, असा सवाल त्यांनी केला. कोणत्या पक्षात जाणार? असा थेट सवाल केल्यानंतर त्यांनी कोणतेही भाष्य केले नाही. पण कार्यकर्त्यांचा आग्रह भाजपमध्ये जावे, असे असल्याचे सांगण्यास ते विसरले नाहीत. खतगावकर भाजपच्या वाटेवर असल्याचे वृत्त ‘लोकसत्ता’ने शुक्रवारच्या अंकात दिले होते. त्याला शनिवारी अप्रत्यक्ष दुजोरा मिळाला. खतगावकर काँग्रेस सोडणार असल्याच्या वृत्ताने काँग्रेसमधील अस्वस्थता वाढली आहे.