महाड येथील तारीक गार्डन इमारत दुर्घटनेतील १६ मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदतीचे वाटप करण्यात आले आहे. शनिवारी एकूण ८० लाख रुपयांचा मदत निधी मृतांच्या वारसांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

२४ ऑगस्टला महाड येथील तारीक गार्डन ही पाच मजली इमारत कोसळली होती. या दुर्घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला.

तर ९ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेची गंभीर दखल घेऊन राज्य सरकारने मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यना निधीतून प्रत्येकी १ लाख तर आपत्ती व्यवस्थापन निधीतून प्रत्येकी चार लाख रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र निधी उपलब्ध न झाल्याने दहा दिवसांनंतरही शासकीय मदत मृतांच्या वारसांना मिळू शकली नव्हती.

मात्र शनिवारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून १६ लाख रुपये तर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून ६४ लाख रुपयांचा निधी जिल्हाप्रशासनाला प्राप्त झाला.

यानंतर लागलीच हा निधी मृतांच्या वारसांच्या खात्यात प्रत्येकी पाच लाख रुपये याप्रमाणे जमा करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे. स्पष्ट केले आहे.

दुर्घटनेतील तीन आरोपी फरारच

महाड येथील तारीक गार्डन इमारत दुर्घटनेप्रकरणी एकूण सहा जणांविरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  या प्रकरणी बांधकाम व्यवसायिक फारूक काझी, त्याचा सहकारी युनूस शेख आणि आरसीसी सल्लागार बाहूबली धामणे या तिघांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे.

मात्र वास्तुविशारद गौरव शहा, महाड नगर पालिकेचे तत्कालिन मुख्याधिकारी दिपक जिंदाड, इंजिनिअर शशिकांत दिघे पोलिसांनी अद्याप ताब्यात घेतलेले नाही.