पोटाची खळगी भरण्यासाठी वर्धा येथे आलेल्या परप्रांतीय मजुरांवर लॉकडाउमुळे उपासमारीचे वेळ येण्याची चिन्हं होती. मात्र ठेकेदाराने काढता पाय घेतल्यावर अनाथ झालेल्या परप्रांतीय मजुरांची जबाबदारी ओदिशाच्या भाजपनेत्यांमार्फत सुत्रं हलवण्यात आल्यानंतर आता वर्धा येथील भाजपा नेत्यांनी स्वीकारली आहे. यामुळे आता या मजुरांच्या अन्न-पाण्याची सोय झाली असून त्यांना दिलासा मिळाला आहे.

सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत वर्धेच्या सौंदर्यीकरणाच्या कामासाठी ठेकेदार प्रतिक पटेल (गुजरात) यांनी ओदिशातून मजूर बोलावले होते. काम सुरू असतांनाच लॉकडउन सुरू झाल्याने मजूर अडकून पडले. प्रशासनाने वाटेत अडकलेल्या मजूरांची जबाबदारी स्वयंसेवी संस्थांकडे तर इथेच कामाला असणाऱ्या मजूरांची जबाबदारी संबंधित ठेकेदाराकडे सोपवली होती. मात्र, ओदिशातील हे मजूर ठेकेदाराने पलायन केल्याने अगतिक झाले होते. त्यांनी वारंवार ठेकेदाराशी संपर्क करूनही उत्तर न मिळाल्याने ते भुकेले झाल्याच्या स्थितीत होते. अखेर शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी ओदिशातील भाजपनेत्यांशी संपर्क साधून परिस्थिती सांगितली. या भाजपा नेत्यांनी दिल्लीस्थित नेत्याशी व तिथून मुंबईतील भाजपा नेते श्रीकांत भारतीय यांच्याशी संपर्क साधून मजुरांच्या अन्न-पाण्याची सोय केली.

वर्धा जिल्हा भाजपाचे सरचिटणीस अविनाश देव यांच्याशी बोलून श्रीकातं भारतीय यांनी या मजुरांची काळजी घेण्याची विनंती केली. यानंतर या मजुरांचा भुकेचा प्रश्ना सुटला. अविनाश देव व त्यांच्या टीमने मजुरांना किराणा, भाजी, तांदूळ व पीठ दिले. यामुळे मजुरांना मोठा आधार मिळाला.

परप्रांतीय मजूरांपैकी एक असलेले थंबीरदास म्हणाले, आम्ही नुसत्या भातावर दोन दिवस काढले. राहण्याची जागाही गलिच्छ व टिनाच्या शेडखाली आहे. आज भाजपानेते अविनाश देव यांनी विचारपूस केल्यावर दिलासा मिळाला. पंधरा दिवसांची व्यवस्था झालेली आहे. या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांना विचारणा केल्यावर त्यांनी बांधकाम खात्याशी बोलून चौकशी करणार असल्याचे उत्तर दिले.