News Flash

…अखेर पालकमंत्री वाशीम जिल्ह्यात दाखल होणार

दोन दिवसांच्या दौऱ्याचे नियोजन

लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : तब्बल पाच महिन्यानंतर वाशीमचे पालकमंत्री शंभूराज देसाई जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. २८ व २९ जून या दिवसांत ते करोनासह विविध उपाययोजनांचा आढावा घेतील.

करोना संकटाशी वाशीम जिल्हावासी दोन हात करीत असतांना पालकमंत्री शंभूराज देसाई मात्र गत पाच महिन्यापासून जिल्ह्यात आलेच नव्हते. २५ जानेवारीला नियोजन समिती बैठक व २६ जानेवारीला ध्वजारोहणासाठी ते आले होते. त्यानंतर त्यांनी वाशीम जिल्ह्याकडे पाठ फिरवली. करोनासारखी गंभीर आपत्ती आल्यावरही त्यांनी वाशीम जिल्ह्यात येण्याचे टाळले होते. हा मुद्दा ‘लोकसत्ता’ने प्रकाशझोतात आणला. त्यावर शंभूराज देसाई यांनी संवाद साधून लवकरच वाशीम जिल्ह्याचा दौरा करणार असल्याचे सांगितले. त्यानुसार येत्या २८ जून रोजी ते जिल्ह्यात दाखल होणार आहेत.

पालकमंत्री देसाई यांचे २८ जून रोजी सायंकाळी ७ वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन होईल. २९ जून रोजी सकाळी ९.३० वा. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत राज्य उत्पादन शुल्क कार्यालय परिसरात वृक्षारोपण होणार आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सकाळी १० वाजता पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत करोना विषाणू संसर्ग व त्यावरील उपाययोजनांचा आढावा सभा होईल. सकाळी ११ वाजता पोहरादेवी विकास आराखडा, पीक कर्ज वाटप, खरीप पेरणी, कायदा व सुव्यवस्था यासह इतर अनुषंगिक बाबींचा पालकमंत्री आढावा घेणार आहेत. दुपारी १.३० वा. महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक व त्यानंतर मंगरूळपीरकडे प्रयाण करतील. दुपारी ३ वाजता मंगरूळपीर येथील कोविड केअर केंद्राची पाहणी व दुपारी ३.४० वाजता कारंजा येथील प्रतिबंधित क्षेत्राची ते पाहणी करतील. त्यानंतर शासकीय वाहनाने नागपूरकडे प्रयाण करणार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 26, 2020 10:19 pm

Web Title: finally the guardian minister will arrive in washim district scj 81
Next Stories
1 अकोल्यात ७६ टक्के रुग्णांची करोनावर मात
2 करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि बळीसंख्येचा आढावा घ्या, मुख्यमंत्र्यांना फडणवीस यांचं पत्र
3 ग्रामीण विकास यंत्रणेच्या ‘उमेद’ प्रकल्पातर्फे  हायजेनिक मटण शॉप सुरू
Just Now!
X