पालघर जिल्ह्यासमोरील समुद्रात सात ते आठ नॉटिकल अंतरावर तेल व नैसर्गिक वायू मंडळामार्फत (ओएनजीसी) समुद्री भूगर्भीय सर्वेक्षण सुरू आहे. या सर्वेक्षण क्षेत्रात मासेमारीसाठी बंदी असल्यामुळे मच्छीमारांवर पुन्हा  आर्थिक संकट कोसळले आहे.

मच्छीमार समाजामार्फत या भूगर्भीय सर्वेक्षणाला मोठा विरोध होत असला तरी हे सर्वेक्षण रेटून नेले जात असल्यामुळे सरकार विरोधात मच्छीमार समाज आक्रमक झाला आहे.  मच्छीमार समाज एकजुटीने याविरोधात आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहे. राज्य हद्दीमधील १२ नॉटिकल क्षेत्राच्या परिसरात हे समुद्री भूगर्भीय सर्वेक्षण पालघर जिल्ह्यासमोरील विविध क्षेत्रात सुरू आहे. हे सर्वेक्षण सुरू असताना मच्छीमारी नौका या क्षेत्रामध्ये जाऊ शकत नाही. तसेच सर्वेक्षणादरम्यान खोल समुद्रात घडवण्यात येणाऱ्या भूगर्भीय हालचालींमुळे येथील मासे इतरत्र स्थलांतरित होत आहेत. यामुळे मच्छीमारांना मासळी मिळत नाही. अलीकडच्या काळात हवामान बदलांसह अनेक कारणांमुळे याआधीच मासेमारी कमी झाली आहे. त्यातच भूगर्भीय सर्वेक्षणामुळे मासेमारी आणखीन घटल्यामुळे मच्छीमार समाज मेटाकुटीला आला आहे. अनेक वेळा या सर्वेक्षणाच्या विरोधात मच्छीमार समाजाने व मच्छीमार संस्थांनी वेळोवेळी आंदोलने ही छेडली होती तसेच या सर्वेक्षणात दरम्यान मच्छीमारांची झालेले नुकसानभरपाई मिळावी यासाठी अनेक वेळा मागण्याही शासनकडे केल्या आहेत. जिल्ह्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये या सर्वेक्षणादरम्यान जिल्ह्यातील २३ संस्थांमधील शेकडो मच्छीमार बांधवांचे सुमारे १४६ कोटीचे नुकसानभरपाई प्रस्तावित आहे. ही  भरपाई केंद्र शासनाकडे प्रलंबित असल्याने अलीकडेच मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनीही आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र शासन वेळोवेळी आश्वाासनाशिवाय  काहीही देत नसल्यामुळे मच्छीमार उपेक्षित राहिल्याची टीका संस्थांसह अनेक मच्छीमार नेत्यांनी केली आहे. गेल्या वेळच्या सरकारप्रमाणे हे सरकारही या मच्छीमार समाजाला उपेक्षितच ठेवत आहे, असे आरोपही यानिमित्ताने करण्यात आले आहेत. हे भूगर्भीय सर्वेक्षण करू नये अशी ठाम मागणी अनेक वेळा शासनामार्फत करण्यात आल्यानंतरही हे सर्वेक्षण रेटून नेले जात असल्यामुळे मच्छीमार समाज संताप व्यक्त करीत आहे.

रोजची फेरी वाया

सर्वेक्षणादरम्यानच्या हालचालींमुळे विविध प्रकारच्या मत्स्यसाठ्याचे थवे इतरत्र स्थलांतरित होत असल्याने मच्छीमार समाजाच्या हाताला काहीच मिळत नाही. दररोजची फेरी वाया जात आहे.असेच सुरू राहील तर मच्छीमारांनी करायचे तरी काय, असा उपस्थित होत आहे.शेतकरी वर्गाप्रमाणे मच्छीमार समाजालाही साहाय्य करावे, अशी मागणी मच्छीमारांनीही केली आहे.