सुरक्षेसाठी दिलेल्या धनादेश व कागदपत्रांचा गैरवापर

सुरक्षेसाठी दिलेले कोरे धनादेश व कागदपत्रांचा गैरवापर केल्याप्रकरणी रामनगर पोलिसांनी सावकार पती-पत्नीसह तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये राजेंद्र जयस्वाल, त्यांची पत्नी स्वाती जयस्वाल व मंगेश येरणे यांचा समावेश आहे. ही कारवाई न्यायालयीन आदेशानंतर उज्ज्वला गंधारे व रितेश गंधारे यांच्या तक्रारीच्या आधारे करण्यात आली आहे.

गंधारे दाम्पत्य बिल्डर्स आहेत. आपल्या व्यवसायासाठी त्यांनी सावकार राजेंद्र जयस्वाल याच्याकडून कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात ते नियमित सावकाराला व्याजासह कर्जाची परतफेड करीत होते. दरम्यान, पुन्हा कर्जाची गरज पडली. तेव्हा सावकाराने काही अटी ठेवल्या. सुरक्षेच्या नावावर घराचे दस्ताऐवज व कोरे धनादेश तसेच स्वाक्षरी केलेले स्टॅम्प पेपरसुद्धा सावकार जयस्वाल यांना दिल्याचे गंधारे दाम्पत्याचे म्हणणे आहे. कर्जाची कर्ज रक्कम परतफेड केल्यानंतरही कोरे धनादेश व दस्तऐवज परत करण्यास जयस्वाल हे टाळाटाळ करीत होते. कागदपत्राच्या आधारे  जयस्वाल याने गंधारेंकडून उभारलेल्या एका अपार्टमेंटमधील काही फ्लॅट्सवर जबरदस्ती ताबा केला. याबाबत गंधारे दाम्पत्याने जयस्वालविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र पोलिसांनी त्यांना न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. दरम्यान, जयस्वालने गंधारे यांच्याकडून सुरक्षेच्या नावावर घेतलेले धनादेश बँकेत जमा केले असता ते वटले नाही. याप्रकरणी जयस्वाल यांनी गंघारेविरुद्ध पोलिसात तक्रार करून त्यांना अटक करायला लावले, असा आरोप गंधारे दाम्पत्याने केला आहे. जयस्वालने मंगेश येरणे नामक मित्राच्या सहाय्याने गंधारे यांनी सुरक्षेच्या नावावर दिलेले धनादेश बँकेत वटविण्यासाठी दिले. मात्र तेही वटले नाही. याप्रकरणीही गंधारेविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल केला होता. आपली फसवणूक होत असल्याबाबत गंधारे दाम्पत्याने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतरही रामनगर पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले. अखेर गंधारे दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणाच्या सुनावणीमध्ये मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी रामनगर पोलिसांना जयस्वाल पती-पत्नीसह तिघांविरुद्ध फसणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. अखेर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. मात्र पोलिसांनी आरोपींना अद्याप अटक केली नाही. सावकाराला अटक करण्याची मागणी फिर्यादी गंधारे दाम्पत्याने यावेळी केली आहे. त्यामुळे पोलीस काय भूमिका घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.