पंचवटी एक्स्प्रेसमधील ‘सी-३’ या आदर्श कोचचा सहावा वर्धापन दिन सोमवारी दुष्काळग्रस्त परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे, अनावश्यक खर्च टाळून बचत झालेला ५१ हजार रुपयांचा निधी रेल परिषदेच्या वतीने दुष्काळग्रस्तांच्या मदतीकरिता मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी देण्यात आला.
स्वच्छता व शांततेचे पालन करून पंचवटी एक्स्प्रेसमधील ‘सी-३’ हा कोच एक आदर्श म्हणून रेल्वे प्रशासनासमोर ठेवणाऱ्या रेल परिषदेने यंदा दुष्काळाची स्थिती लक्षात घेऊन आदर्श कोचचा सहावा वर्धापनदिन अत्यंत साधेपणाने साजरा करत याद्वारे बचत झालेली रक्कम दुष्काळग्रस्त परिस्थितीला मदत म्हणून देण्यात आली. रेल्वेगाडीत सकाळी छोटेखानी कार्यक्रमात वर्धापन दिन साजरा करण्यात आला. तसेच मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसमधील फलाट क्रमांक १७वर सायंकाळी या स्वरूपाच्या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी परिषदेचे अध्यक्ष बिपिन गांधी, उद्योजक देवकिसन सारडा, शिवाजी मानकर, देविदास पंडित आदी उपस्थित होते. याप्रसंगी एसी कोचची देखभाल करणारा अमोल दळवी, तिकीट निरीक्षक राजाराम शिंदे, डॉ. नागेश कांबळे, अतुल क्षीरसागर यांच्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना गौरविण्यात आले. सत्कारात मिळालेली रक्कम शिंदे यांनी ५,५०० रुपये दुष्काळग्रस्त निधीसाठी दिले. या वातानुकूलित डब्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सहा वर्षांपूर्वी रेल परिषदेचे अध्यक्ष गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली डबा आदर्श कसा होईल, यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले. या डब्यातील प्रवाशांकरिता त्यासाठी काही नियम घालून देण्यात आले. गडबड-गोंधळास पूर्णपणे फाटा, इगतपुरीच्या पुढे गाडी गेल्यावर मोबाइलही बंद करून ठेवणे, डब्यात स्वच्छता व शांतता राहावी म्हणून सर्वानी प्रयत्न करणे, अशा नियमांमुळे हा डबा सर्वाच्या चर्चेचा विषय ठरला. रेल्वेनेही या डब्याची वेगळी ओळख लक्षात घेऊन त्यास आदर्श कोच म्हणून दर्जा दिला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्सनेही या डब्याची विशेष दखल घेतली. गेल्या पाच वर्षांपासून कोचचा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा, मात्र त्यास फाटा देण्यात आला. वर्धापन दिनासाठी जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देण्यात आली.