11 December 2017

News Flash

सोलापुरात निर्मल कॉर्पोरेशनचा ठेवीदारांना १.६० कोटीचा गंडा

संचालकांसह आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

प्रतिनिधी, सोलापूर  | Updated: August 10, 2017 1:16 AM

आकर्षक व्याजदराचे आमिष दाखवून लाखोंची ठेव घेऊन नंतर ठेवीदारांची फसवणूक करण्याचे प्रकार सोलापुरात दिवसेंदिवस वाढत चालले असताना त्यात निर्मल कॉर्पोरेशन कंपनीने केलेल्या एक कोटी ६० लाखांच्या घोटाळ्याची भर पडली आहे. यासंदर्भात कंपनीच्या संबंधित संचालकांसह आठ जणांविरूध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

फसवणूक झालेल्या ठेवीदारांपैकी भैरप्पा धरेप्पा कुरे (वय ३७, रा. बंकलगी, ता. दक्षिण सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार निर्मल कॉर्पोरेशनचे संचालक मध्यप्रदेशातील राहणारे आहेत. कंपनीने सोलापुरातील दोघांना हाताशी धरून आर्थिक घोटाळा केल्याचे उजेडात आले आहे. अभिषेक एस. चौहान, हरिश शर्मा, निर्मलादेवी चौहान, सुहास  सोनी (सर्व रा. काला पिंपाला मंडी, जि. शहाजापूर), फुलसिंग चौधरी (रा. तिन्डोनिया, जि. राजनर), निरंजन सक्सेना (रा.भोपाळ) आणि सुहास  विजय गाकावे व कुणाल लक्ष्मीकांत इंगळे (दोघे रा. सोलापूर) अशी आरोपींची नावे आहेत. शहरातील विजापूर रस्त्यावर नडगिरी पेट्रेल पंपाजवळ विक्रम प्लाझा इमारतीत निर्मल कॉर्पोरेशन कंपनीचे कार्यालय पाच वर्षांपूवी थाटण्यात आले होते. या कंपनीने आकर्षक ठेव योजना जाहीर करून ठेवीदारांवर भुरळ पाडली होती. जादा व्याजदराने कायम ठेव योजनेला ठेवीदारांना मोठा प्रतिसाद दिला होता. सुरूवातीला कंपनीने ठरल्याप्रमाणे जादा व्याज दर देऊन ठेवीदारांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे शेकडो मध्यमवर्गीयांनी कंपनीवर विश्वास दर्शवित मोठय़ा प्रमाणात ठेवींच्या रुपात गुंतवणूक केली होती. या ठेवीदारांपैकी भैरप्पा कुरे यांनी १ नोव्हेंबर २०१२ रोजी कंपनीच्या कार्यालयात तीन लाख २० हजारांची रक्कम ठेवीच्या स्वरूपात गुंतविली होती. पुढे १ ऑगस्ट २०१६ रोजी अचानकपणे कंपनीने ठेवीची रक्कम परत करण्याबाबत हात वर करीत जबाबदारी टाळली. त्याचवेळी इतर अनेक ठेवीदारांनाही कंपनीने गंडा घातला.  ठेवीची रक्कम परत मिळण्यासाठी ठेवीदारांनी कंपनीकडे वारंवार पाठपुरावा केला. परंतु कंपनीने  ठेवीची रक्कम परत करण्यास असमर्थता दर्शवत आर्थिक फसवणूक केली. त्यासाठी कंपनीच्या संचालकांसह अधिकाऱ्यांनी कट रचून ठेवीच्या एक कोटी ५९ लाख ९० हजार २७८ रुपये इतक्या रकमेचा परस्पर अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

गेल्या वर्षभभरात सोलापुरात विविध कंपन्यांनी कार्यालये थाटून ठेवीदारांचा विश्वास संपादन करून कोटय़वधींच्या ठेवी घेतल्या आणि नंतर घोटाळा केल्याचे तब्बल १९ गुन्हे नोंद आहेत. काही कंपन्यांचे संचालक कोलकाता, विजयवाडा, भोपाळ, बंगळुरू आदी दूरच्या भागातील राहणारे असून त्यांचा ठावठिकाणा लावणे पोलीस तपास यंत्रणेला आव्हान ठरले आहे.

First Published on August 10, 2017 1:16 am

Web Title: financial scam by nirmal corporation at solapur