वाळू चोरांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने गेल्या वर्षभरात केलेल्या कारवाईत ८५४ वाहने पकडून त्यांच्याकडून अवैध गौण खनिज वाहतुकीच्या कारणावरुन एकूण २ कोटी ४१ लाख ८ हजार ८१६ रुपयांचा दंड वसूल केला आहे. ९८ गुन्हे दाखल करण्यात आले तर ६५ वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओ कार्यालयाकडे प्रकरणे पाठवण्यात आली आहेत. अवैध वाळू वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ४१ चेकपोस्ट तैनात करण्यात आले आहेत.
अतिरिक्त जिल्हाधिकारी शरद जाधव यांनी ही माहिती दिली. दंड भरण्यास कुचराई करणा-या वाहतूकदारांविरुद्ध जप्तीची कारवाई करण्याची तसेच वाळू लिलाव होईपर्यंत चेकपोस्ट सुरूच ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यंदा प्रशासनाने १९४ वाळूसाठय़ांचे ई-लिलाव आयोजित केले होते, तसेच वाळू उपसा व वाहतुकीसाठी ‘स्मॅटस् अ‍ॅप सिस्टीम’ लागू केली मात्र वाळू लिलावास जिल्ह्य़ात वाळू ठेकेदारांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे फेरलिलाव होणार आहेत. कर्जत व श्रीगोंदे तालुक्यांतील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणा-यांच्या बोटी उद्ध्वस्त करण्याच्या मोहिमेमुळे तर चांगलाच वचक निर्माण झाला आहे.
एप्रिल ते डिसेंबर २०१४ पर्यंत ७८५ वाहने पकडून २ कोटी १७ लाख ६० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. जाधव यांनी या मोहिमेला आणखी गती दिली. त्यानंतर जानेवारीच्या १७ दिवसांत ६९ वाहने पकडण्यात आली व त्यांच्याकडून २३ लाख ४८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाळूचोरीचे गुन्हे दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुळापाशी जाऊन शोध घेतल्यास अवैध उत्खनन व वाहतुकीवर अधिक नियंत्रण ठेवता येईल, या उद्देशाने जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली.
वाळूचोरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सशस्त्र पोलीस व महसूल कर्मचारी यांच्या संयुक्त पथकांचे जिल्ह्य़ात ४१ चेकपोस्ट तैनात करण्यात आले आहेत. संगमनेरमध्ये ३, कोपरगावमध्ये ५, नगर ३, पारनेर ४, शेवगाव ५, राहुरी ४, श्रीरामपूर ४, जामखेड व श्रीगोंदे प्रत्येकी २, कर्जत ४, पाथर्डी व राहाता प्रत्येकी १ व नेवासे २ असे चेकनाके तयार करण्यात आले आहेत.