News Flash

यवतमाळातील हत्याकांडात १० जणांविरोधात खुनाचा गुन्हा

मृताची पत्नी आभा करण परोपटे (२७) हिने शहर पोलिसांत स्वत:च्या भावासह १० जणांविरोधात तक्रार दाखल केली.

प्रतिनिधिक छायाचित्र

भावानेच पतीचा खून केल्याची बहिणीची तक्रार

यवतमाळ : येथील स्टेट बँक चौकात बुधवारी रात्री एका तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एका गुन्हेगारी टोळीचा संबंध असल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. मृताची पत्नी आभा करण परोपटे (२७) हिने शहर पोलिसांत स्वत:च्या भावासह १० जणांविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी सर्व १० जणांविरुद्ध गुन्हा नोंदवत चौघांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणातील मुख्य आरोपी कुख्यात गुंड अक्षय राठोड आहे. तो सध्या एमपीडीए कायद्यांतर्गत औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध आहे. त्याने कारागृहातूनच या हत्याकांडाची सूत्रे हलवल्याचा संशय आहे. आरोपींमध्ये अक्षय आत्मारात राठोड (३२), आशीष ऊर्फ बगिरा दांडेकर (३०), शुभम बघेल (२५), धीरज ऊर्फ बंड (२५), गौरव गजबे (३०), प्रवीण ऊर्फ पिके केराम (२८) सर्व रा. यवतमाळ, दिनेश तुरकाने (२५) रा. बाभूळगाव, कल्या ऊर्फ नितेश मडावी (२८), दिलीप ठवकर (३०), अर्जुन भांजा (२७) तिघेही रा. दिघोरी नाका, नागपूर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबतची मृताची पत्नी आभा करण परोपटे (२७) रा. राणी अमरावती ता. बाभुळगाव यांनी शहर पोलीस ठाण्याला फिर्याद दिली. तिचा पती करण परोपटे याची बुधवारी रात्री बंदुकीच्या चार गोळ्या झाडून निर्घृण हत्या करण्यात आली होती. मृत करण हा औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध असलेल्या अक्षय राठोडचा जावई आहे. फिर्यादी आभा ही अक्षयची लहान बहीण आहे. मृत करण वाळूचा व्यवसाय करीत होता. त्यातील व्यवहाराच्या वादातूनच त्याची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना तसेच मृताच्या कुटुंबीयांना आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या एका विनयभंगाच्या घटनेची किनारही या हत्याकांडामागे असावी, असा पोलिसांना संशय आहे. बुधवारी रात्री घटना घडली तेव्हा घटनास्थळी आशीष ऊर्फ बगिरा, शुभम बघेल आणि अन्य एक जण होता, अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली. तर मृताच्या पत्नीने या हत्याकांडात थेट स्वत:चा मोठा भाऊ कुख्यात गुंड अक्षय राठोडच्या विरोधात पतीच्या खुनाचा कट रचणे, खुनाचा प्रयत्न करणे, खून करणे आणि जातिवाचक शिवीगाळ करणे आदी आरोप करून तक्रार केल्याने हे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. पोलिसांनी अक्षयला मुख्य आरोपी बनवून अन्य नऊजणांना सहआरोपी केले आहे. या सर्वाविरोधात गुन्हे दाखल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र त्यांची नावे अद्याप जाहीर केली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 25, 2021 12:01 am

Web Title: fir against 10 people in yavatmal youth murder case after wife complaint zws 70
Next Stories
1 मालेगावात ‘अल्प्राझोलम’ उत्तेजकाचा वापर चिंताजनक
2 गेल इंडिया, वितारा एनर्जीची राज्यात १६ हजार ५०० कोटींची गुंतवणूक
3 Maharashtra Corona Update : राज्यात रिकव्हरी रेटसोबतच मृत्यूदर देखील वाढला; २४ तासांत १९७ मृतांची नोंद!
Just Now!
X