संगमनेर : विवाह जुळण्यासाठी असलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून एका घटस्फोटित महिलेशी परिचय वाढवत संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. संबंधित पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिस कर्मचाऱ्यांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या पुणे जिल्ह्यतील आळे येथील एका डॉक्टरचाही समावेश आहे.

सुनील यशवंत रत्नपारखी असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याची नियुक्ती संगमनेर तालुक्यातील घारगाव पोलिस ठाण्यात आहे. याशिवाय आळेफाटा येथील डॉ. व्ही. जी. मेहेर ( निरामय हॉस्पिटल, ता. जुन्नर, जि. पुणे), रत्नपारखी याचा नातेवाईक अमोल कर्जुले व त्याच्या आईचा देखील आरोपींमध्ये समावेश आहे.

सोलापूर जिल्ह्यतील घटस्फोटित असलेल्या पीडित महिलेला रत्नपारखी याने विवाह जुळवण्याच्या एका संकेतस्थळावरून लग्नाची मागणी घातली. संबंधित महिलेने आपणास दहा वर्षांची मुलगी असून तिचा सांभाळ करणार असाल, तरच लग्न करण्याची अट घातली होती.  रत्नपारखी याने देखील आपण घटस्फोटित असून आपणास दोन मुली आहेत, त्या दोघीही सोबत राहतात, असे या महिलेला सांगितले. यामुळे महिलेने लग्नास संमती दर्शविली होती.

रत्नपारखी याने संबंधित महिलेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्या सोबत राहत आठ-दहा महिने तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. यातून तिला गर्भधारणा झाली ही गोष्ट समजल्याने रत्नपारखी याने गर्भपात करण्याचा आग्रह तिच्याकडे धरला. मात्र गर्भपातास संबंधित महिलेने विरोध केल्याने रत्नपारखी याने त्याचे नातेवाईक असलेल्या अकोले येथील अमोल कर्जुले व त्याच्या आईला घारगावात नेऊन गर्भपातासाठी या महिलेवर दबाव आणला. तसेच तिच्या दहा वर्षांच्या मुलीला ही मारहाण शिवीगाळ दमदाटी करण्यात आली.

त्यानंतर या महिलेस पुणे जिल्ह्यतील आळे येथील डॉ. व्ही. जी. मेहेर यांच्या निरामय हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले व तेथे तिचा गर्भपात करण्यात आला. संबंधित महिलेने सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांच्यासमोर कैफियत मांडली. त्यानंतर घारगाव पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचारी असलेल्या रत्नपारखी याच्यासह चार जणांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे रत्नपारखी याने या महिलेचा दोनदा गर्भपात केल्याचे समोर आले आहे.