06 August 2020

News Flash

शेतकरी आत्महत्याप्रकरणी शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा

पाच महिन्यांनंतर उस्मानाबाद पोलिसांची कारवाई

कट कारस्थान करून शेतकर्‍याची आर्थिक फसवणूक केल्यामुळे शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांना जबाबदार धरण्यात आले आहे. ओम राजेनिंबाळकर यांच्यासह 52 जणांवर फसवणूक व शेतकर्‍यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तब्बल पाच महिन्यांनंतर उस्मानाबाद पोलिसांनी ही कारवाई केली आहे. शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महत्येपूर्वी खासदार राजेनिंबाळकर यांच्यासह उध्दव ठाकरे यांच्या नावे चिठ्ठी लिहून गळफास घेतला होता. ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत 12 एप्रील रोजी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप शंकर ढवळे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली.

आत्महत्येपूर्वी त्यांनी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली. त्यातून जमिनीवर जप्ती आली. या सर्व त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले. सविस्तर पुरावे घरी कपाटातील पिशवीत पहायला मिळतील, असेही आत्महत्त्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले होते. विशेष म्हणजे आणखी एका पत्रात त्यांनी थेट उध्दव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती.

पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या सर्व गोष्टी साक्षीदारांसमक्ष ताब्यात घेवून कुटूंबियांचा जबाब नोंदवून घेतला आणि मयत शेतकर्‍याने लिहिलेली चिठ्ठी हस्ताक्षर तज्ञांकडे तपासणीसाठी पाठविली होती. त्याचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर खासदार राजेनिंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक, तेरणा कारखान्याच्या अध्यक्ष आनंदीदेवी राजेनिंबाळकर, कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक अशा एकूण 52 जणांच्या विरोधात ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची जमीन वसंतदादा बँकेकडे गहाण ठेवली होती. कारखान्याने कर्ज न भरल्यामुळे ढवळे यांची जमीन लिलावात निघाली होती. या तणावामुळे त्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली. लोकसभा निवडणूक अवघ्या सात दिवसांवर येवून ठेपली असताना हा प्रकार घडल्यामुळे हा मुद्दा निवडणुकीत चांगलाच गाजला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मयत ढवळे यांच्या कुटूंबियांची त्यांच्या घरी जावून चौकशी केली होती. तर उध्दव ठाकरे यांनी या प्रकरणातील दोषींना कठोर शासन व्हायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. तब्बल पाच महिन्यानंतर ढवळे यांच्या आत्महत्याप्रकरणी खासदार राजेनिंबाळकर यांच्यासह 52 जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या खासदारावर गुन्हा नोंद झाल्यामुळे उध्दव ठाकरेंसह शिवसेनेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2019 6:51 pm

Web Title: fir against shivsena mp omraje nimbalkar osmanabad police nck 90
Next Stories
1 उदयनराजेंच्या प्रवेशावरून रोहित पवारांचा भाजपाला सल्ला, म्हणाले…
2 राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर शरद पवार भडकले
3 गडचिरोली : दोन नक्षलवाद्यांचा खात्मा, पाच जखमी
Just Now!
X