महापालिका हद्दीतील देवळाली येथील शेतजमीन खरेदीत खोटय़ा करारनाम्यातील दस्त खरा असल्याचे भासवून स्वत:चे नाव मिळकतीच्या महसूल दप्तरी बेकायदेशीररित्या नोंदवून घेण्याप्रकरणात नाशिकरोड न्यायालयाने प्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश उपनगर पोलीस ठाण्यास दिले आहेत.
विनायक धोपावकर, विजया करंदीकर, विष्णू शिंदे यांच्याकडून आपणास मिळालेल्या मिळकतीतील हक्क व अधिकार डावलण्याच्या उद्देशाने १६ एप्रिल २००८ रोजी कथित जमीन मालक दरगोडे बंधू यांच्याशी सुरेश वाडकर, सोनू निगम आणि कोटीकर यांच्यासोबत साठेखत करारनामा करण्यात आला होता, असे फिर्यादी मुकूंद कोकिळ यांनी म्हटले आहे. सदर मिळकतीसंदर्भात असलेल्या विविध कारणांमुळे दरगोडे बंधू यांना वाडकर व इतरांच्या लाभात खरेदीखत नोंदवून देता आले नव्हते. खरेदीखत मिळत नसल्याने वाडकर, निगम, कोठीकर यांनी दावा दाखल केला होता. या मिळकतीसंदर्भात कोर्ट रिसीव्हरची नेमणूक करण्यात आली असून अद्याप ही जमीन त्यांच्याच ताब्यात आहे. दरगोडे बंधू यांच्याकडून आपल्याला खरेदीखत नोंदवून मिळण्यास कायदेशीर अडचणी येत असल्याचे दिसताच वाडकर यांनी धोोपावकर, करंदीकर, शिंदे यांच्याकडे मिळकतीसंदर्भात कुठल्याही प्रकारचे अधिकार नसताना फिर्यादीच्या मिळकतीतील हक्क व अधिकार नष्ट करण्यासाठी नमूद मिळकतीचे मालक धोपावकर, करंदीकर, शिंदे हे असल्याचे भासविले. या मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा या तिघांकडेच असल्याचे भासवून सहा फेब्रुवारी २०१३ रोजी बनावट करारनामा नोंदविला. वाडकर यांनी बनावट करारनामा खरा असल्याचे भासवून स्वत:चे नाव मिळकतीच्या महसूल दप्तरी बेकायदेशीरपणे नोंदविल्याची फिर्याद कोकिळ यांनी न्यायालयात दाखल केली. याआधीही कोकिळ यांनी २७ ऑगस्ट २०१४ रोजी उपनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली होती. परंतु त्यासंदर्भात कोणतीही कारवाई न झाल्याने कोकिळ यांनी न्यायालयात धाव घेतली. फिर्यादीचे आरोप दखलपात्र मानत न्या. आशिष वामन यांनी आरोपींविरोधात उपनगर पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.