News Flash

ज्यांचा गुन्हा नाही, त्यांच्यावर गुन्हे आणि मुख्यमंत्री स्वतःचे गुन्हे लपवत आहेत : शरद पवार

"राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ"

संग्रहीत

निवडणूक शपथपत्रात दोन गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरूद्ध खटला चालवण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली. गुन्हे लपवल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “राज्याचे मुख्यमंत्री स्वतःवरील गुन्हे लपवण्याचे काम करत आहेत. ज्यांच्यावर कोणताच गुन्हा नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय,” अशी टीका पवार यांनी केली आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत शपथपत्र सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रलंबित असलेल्या दोन गुन्हेगारी प्रकरणांची माहिती दिली नव्हती. या प्रकरणात अ‍ॅड. सतीश उके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी रद्द केली जावी अशी मागणी त्यांनी केली होती. जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने हा निकाल राखून ठेवला होता. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने खटला चालवण्यास मंजुरी दिली. तर शिखर बॅंक घोटाळ्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच शरद पवार यांच्यावरही ईडीने गुन्हा दाखल केला होता. या घोटाळ्यात पवार यांचे नाव कसे आले, यावरून बऱ्याच उलटसुलट चर्चाही झाल्या. भाजपाकडून राजकीय सूडबुद्धीने हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांच्या नेत्यांनी केला होता. यावर सत्तेत असलेल्या शिवसेनेनेही पवार यांची बाजू घेतली होती. तसेच अजित पवार यांनीही राजीनामा दिला होता.

या दोन्ही प्रकरणावरून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. पवार म्हणाले, “निवडणुकीचा अर्ज भरताना आपल्यावरील गुन्ह्यांची माहिती सादर करणे गरजेचे असते. मात्र राज्याचे मुख्यमंत्रीच स्वतःवरील गुन्हे लपवण्याचे काम करत आहेत. ज्यांच्यावर कोणताच गुन्हा नाही त्यांच्यावर गुन्हा दाखल होतोय, पण गुन्हेगारांना कसलीच फिकीर नाही. इथे सत्तेचा गैरवापर होतोय,” असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

भाजपा सरकारच्या काळात महिलांवरील गुन्हे वाढल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले, “राज्यात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली आहे. यातील सर्वाधिक गुन्हे हे स्त्रियांवरील अत्याचारांचे आहेत. त्यामुळे ज्यांना आपल्या आई-बहिणींच्या अब्रूची काळजी नाही, त्यांच्या हाती सत्ता देणं चुकीचं ठरेल,” असं पवार म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 2, 2019 10:06 am

Web Title: fir against those who are not guilty and the chief minister are hiding their crimes bmh 90
Next Stories
1 वांद्रे-वरळी सी लिंकवर गडकरींनाही भरावा लागला होता दंड
2 आमची युती ओवेसींच्या एमआयएमसोबत -प्रकाश आंबेडकर
3 खाकीतली माणुसकी : नागपूर पोलिसांनी दिला तान्हुलीला नवा जन्म
Just Now!
X