भारतीय जनता पार्टीचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केल्याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध या जिल्ह्य़ातील शेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. शेगावचे माजी नगराध्यक्ष व भारतीय जनता पक्षाचे शेगाव येथील नेते सत्यनारायण व्यास यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हे गुन्हे दाखल केले आहेत.
अरविंद केजरीवाल यांनी ३१ जानेवारीला दिल्लीत पत्रकार परिषदेत नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. लोकसभा निवडणुकीत या भ्रष्ट नेत्यांविरुद्ध आम आदमी पार्टी िरगणात उतरेल, असा इशाराही त्यांनी दिला होता.
केजरीवाल यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेल्या नेत्यांच्या यादीत भाजपचे नितीन गडकरी, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, खासदार सुरेश कलमाडी, मुलायमसिंह यादव, अर्थमंत्री पी. चिदम्बरम, जगमोहन रेड्डडी, कपिल सिब्बल, फारूक अब्दुल्ला यांच्यासह १६२ नेत्यांचा समावेश आहे. या यादीत नितीन गडकरी यांचेही नाव असून शेगाव पोलिसांत तक्रार करणाऱ्या सत्यनारायण व्यास यांनी केजरीवाल यांचे गडकरींवरील आरोप निराधार असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. केजरीवाल यांच्या वक्तव्यामुळे गडकरी व पक्षाची अकारण बदनामी झाली असून त्यामुळे आपल्या भावना दुखावल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. शेगाव पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे केजरीवाल यांच्याविरुद्ध भादंवि ४९९, ५०० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी शेगाव पोलीस पुढील काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे.