महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जुन्नरचे आमदार शरद सोनावणे यांच्याविरोधात, जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुन्नर पोलिस ठाण्यातील सहायक महिला पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे यांना शिवीगाळ करुन त्यांच्या कामात अडथळा आणल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर पोलीस ठाण्यातील पथकाने मनसे कार्यकर्ता योगेश भोंडवे याच्या रेशनिंगच्या गव्हाची बेकायदेशीर वाहतूक करणारी पिकअप गाडी पकडली होती. सहायक पोलिस निरीक्षक ज्योती डमाळेही या पथकात होत्या. या प्रकारानंतर आमदार शरद सोनावणे यांनी आपल्या ४० ते ५० कार्यकर्त्यांसह जुन्नर पोलीस स्थानक गाठलं.

यावेळी, “मी ऑफिसला बोलावूनही तुम्ही का आलात नाही”? असं विचारत सोनावणे यांनी ज्योती डमाळे यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. याचसोबत आपल्या पदाचा गैरवापर करुन पकडलेली रेशनिंगच्या गव्हाची गाडी सोडण्यासाठीही सोनावणे यांनी आपल्यावर दबाव टाकल्याची तक्रार डमाळे यांनी केली आहे. या तक्रारीवरुन पोलिसांनी शरद सोनावणे यांच्याविरोधात गुन्ह्याची नोंद केलेली आहे, याप्रकरणी पोलीस आता पुढे काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.