आरोपींसह पोलीस सांगली, मांडवाला रवाना
अकोल्यातील किडनी तस्करी प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात अवयव तस्करीचा गुन्हा शुक्रवारी दाखल करण्यात आला. या प्रकरणातील दोन आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आल्यावर एका आरोपीच्या पोलीस कोठडीत १५ डिसेंबपर्यंत वाढ करण्यात आली असून, एकाची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अधिक तपासासाठी पोलिसांचे पथक मुख्य सूत्रधार शिवाजी कोळीसह सांगली येथे तर, दुसरे पथक आरोपी पवारसह बुलढाणा जिल्ह्य़ातील मांडवा येथे रवाना झाले आहे.
किडनी तस्करी प्रकरणातील अकोल्यातील आरोपी आनंद जाधव व देवेंद्र शिरसाट यांची पोलीस कोठडी संपल्याने शुक्रवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपी आनंद जाधव याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. देवेंद्र शिरसाटकडून तपासात आणखी माहिती घेणे आवश्यक असल्याने त्याच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यानुसार न्यायालयाने सरकारी पक्षाची बाजू ग्राह्य़ धरत देवेंद्र शिरसाट याच्या पोलीस कोठडीत सलग तिसऱ्यांदा १५ डिसेंबपर्यंत वाढ केली आहे. मुख्य सूत्रधार शिवाजी कोळीला घेऊन पोलीस पथकाने नागपुरात तपास केला. त्यानंतर आता कोळीसह पोलिस पथक सांगली जिल्ह्य़ात गेले आहे. कोळी याच्या मूळ गावी पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येणार आहे. दुसरे पथक आरोपी विनोद पवारसह बुलढाणा जिल्ह्य़ातील मांडवा येथे गेले आहे. या प्रकरणात पवार याच्या मुळ गावी जाऊन तपास करण्यात येत आहे.
या प्रकरणातील वैद्यकीय समितीने आपले सर्व अहवाल पोलिसांकडे सादर केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अवयव तस्करी केल्याप्रकरणी हा गुन्हा सर्व आरोपींवर दाखल करण्यात आला आहे. नांदुरा येथील एका महिलेची शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.राजेश कार्यकर्ते यांच्यासह तीन तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीपुढे काल त्या महिलेनेही किडनी प्रत्यारोपण केले का, याची तपासणी करण्यात आली आहे. वैद्यकीय समितीने त्याचा अहवाल पोलिसांकडे शुक्रवारी सादर केल्याची माहिती आहे.