नाशिक येथे ऑक्सिजनच्या गळतीमुळे २४ रुग्णांना आपले प्राण गमावल्याची घटना ताजी असतानाच विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरार पश्चिम येथील विजय वल्लभ रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला मध्यरात्रीनंतर आग लागली होती. यामध्ये १३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चार मजली असणाऱ्या या रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. यावेळी अतिदक्षता विभागात १७ करोनाबाधित रुग्ण उपचार घेत होते. त्यापैकी १३ रुग्णांचा या आगीत मृत्यू झाला आहे. दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि इतर रुग्णांची सुटका करण्यात आली. तर ५ रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागात रात्री ३ वाजल्याच्या सुमारास  ही आग लागली. आग इतकी भीषण होती की, यात अतिदक्षा विभागातील १३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुळसळ यांनी दिली. सध्या अग्निशमन विभागाने आगीवर नियंत्रण मिळवले असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयांमध्ये हलविण्याचे काम सुरू आहे.

दरम्यान, धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घडल्या नंतर वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त घटनास्थळी उपस्थित नव्हते. केवळ स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनीच इतर रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवले. मृतांमध्ये पाच महिला आणि आठ पुरुषांचा समावेश आहे.

मृतांची नावं –
१) उमा सुरेश कनगुटकर –  (स्त्री – ६३ वर्ष)
२) निलेश भोईर –  (पुरुष – ३५ वर्ष)
३) पुखराज वल्लभदास वैष्णव – (पुरुष – ६८ वर्ष)
४) रजनी आर कडू  – (स्त्री – ६० वर्ष)
५) नरेंद्र शंकर शिंदे  – (पुरुष – ५८ वर्ष)
६) जनार्दन मोरेश्वर म्हात्रे – (पुरुष – ६३ वर्ष)
७) कुमार किशोर दोशी – (पुरुष – ४५ वर्ष)
८) रमेश टी उपयान  – (पुरुष – ५५ वर्ष)
९) प्रविण शिवलाल गोडा (पुरुष – ६५ वर्ष)
१०) अमेय राजेश राऊत – (पुरुष – २३ वर्ष)
११) शमा अरुण म्हात्रे  – (स्त्री – ४८वर्ष)
१२) सुवर्णा एस पितळे – (स्त्री – ६४ वर्ष)
१३) सुप्रिया देशमुख – (स्त्री – ४३ वर्ष)