नागपूर : भंडारा जिल्हा रुग्णालयाच्या अग्निसुरक्षेची तपासणी (फायर ऑडिट) झाले नसल्याचे वास्तव समोर आले आहे. भंडारा शल्यचिकित्सकांनी येथे अग्निशमन यंत्रणेची व्यवस्था नसल्याने मे २०२० रोजी सहसंचालक (आरोग्य सेवा, मुंबई) यांच्याकडे १ कोटी ५२ लाख ४४ हजार ७८३ रुपयांच्या आराखडय़ाला मंजुरी देण्याची मागणी केली होती. अशा स्थितीत इमारतीची अग्निसुरक्षा तपासणी झाली नसताना २०१५ मध्ये तत्कालीन मंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन कसे  झाले, असा प्रश्न दुर्घटनेनंतर ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयातील या इमारतीचे बांधकाम २०११ मध्ये सुरू झाले व उद्घाटन २०१५ मध्ये झाले. शासनाच्या नियमानुसार कोणत्याही नवीन वास्तूचे उद्घाटन करताना तिचे अग्निशमन व वीज यंत्रणेची तपासणी संबंधित यंत्रणेकडून करणे गरजेचे असते. परंतु दहा बालकांचा बळी घेणाऱ्या ‘एसएनसीयू’चे अशी कुठलीही तपासणी झाले नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या कक्षाचे उद्घाटन कुणाच्या सल्ल्याने झाले, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांनी मे २०२० रोजी नागपूरच्या आरोग्य उपसंचालकांमार्फत सहसंचालक, आरोग्यसेवा मुंबईला पत्र देत भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सल्लागारामार्फत सर्वेक्षण केल्याचे स्पष्ट केले. या निरीक्षणात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने १ कोटी ५२ लाख ४४ हजार ७८३ रुपये खर्च करून अग्निशमन यंत्रणा उभारण्याबाबतचे अंदाजपत्रक तयार केले. त्याला मंजुरी देण्याची विनंतीही सार्वजनिक आरोग्य खात्याला करण्यात आली. तरीही अग्निसुरक्षा तपासणी झालेली नाही. याबाबत आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले,  ही नवीन इमारत सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधल्याने त्यात अग्निशमन अंकेक्षणाचा वाद निर्माण करणे योग्य नाही. तसा कुठलाही प्रस्ताव माझ्याकडे आला  नाही.