वाघांसह वन्यप्राण्यांचे स्थलांतर?
विदर्भ आणि तेलंगणाच्या सीमेवर असलेल्या केळापूर तालुक्यातील प्रसिद्ध टिपेश्वर अभयारण्याला मंगळवारी दुपारी आग लागून ६० टक्के जंगल जळून राख झाले. आगीच्या पाश्र्वभूमीवर या जंगलातील १३ वाघांसह अन्य पशुपक्षी स्थलांतर करण्याची भीती निर्माण झाली आहे. अभयारण्याला कुठेही कुंपण नाही. केवळ शिंगणा आणि माथनी या दोन गावांच्या सीमेवर प्रवेशद्वार आहे.
तब्बल ३०० एकराच्या विस्तीर्ण क्षेत्रात पसरलेल्या या अभयारण्यातील टिपेश्वर या गावाचे पूर्णपणे पुनर्वसन झालेले आहे. मात्र, नऊ कुटुंबे अद्यापही जंगलातच वास्तव्याला असल्याने ती या अग्नितांडवात अडकली किंवा कसे हे समजू शकले नाही.
विदर्भातील अनेक वनाधिकाऱ्यांपासून महसूल आणि पोलीस दल, तसेच पांढरकवडा नगरपालिकेचे पदाधिकारी, कर्मचारी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे वृत्त आहे. अभयारण्याचा प्रचंड विस्तार लक्षात घेता व आगीचे रौद्ररूप पाहता आग आटोक्यात आणणे कठीणच आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी गजेय लांबाडे यांच्या अथक प्रयत्नामुळे टिपेश्वर अभयारण्याकडे पर्यटकांचा ओढा वाढलेला असतानाच या घटनेने वन्यजीवप्रेमींना अतिव दु:ख झाल्याची प्रतिक्रिया पक्षीतज्ज्ञ डॉ. रहमान विराणी, प्राचार्य डॉ. धर्मेद्र तेलगोटे, प्राचार्य डॉ. उदय यावलेकर यांनी व्यक्त केली.