चार दिवसांत वनसंपदाची राख; शेकडो वन कर्मचारी असताना वणवे सुरूच

रमेश पाटील, लोकसत्ता

वाडा:  ऐतिहासिक वारसा व २४ हजार हेक्टर क्षेत्राची वनसंपदा लाभलेल्या वाडा तालुक्यात वणव्याचे प्रकार वाढले असून गेल्या चार दिवसांपासून इतिहासाची साक्ष देणाऱ्या कोहोज किल्लय़ाच्या परिसराला वनव्याने वेढले आहे. वनविभागाचे तीन स्वतंत्र विभाग आणि शेकडो कर्मचाऱ्यांचा फौजफाटा असतानाही शिकारीच्या उद्देशाने वणवे भडकवण्याचे प्रकार सुरू असल्याने निसर्गप्रमींनी नाराजी व्यक्त केली आहे.

दोन दिवसांपूर्वी पिंपळास येथील जंगलात लागलेल्या आगीत ३५ ते ४० हेक्टर क्षेत्रावरील जंगल होरपळून गेले. वनविकास महामंडळ यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या या जंगलात गेल्या चार वर्षांत येथे वनविकास महामंडळ कडून २५ हजाराहून अधिक वृक्षांची लागवड केली होती. मात्र या आगीत ही सर्व कोवळी वृक्ष होरपळून गेल्याने शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील वनसंपदामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पाऊलखुणा दर्शविणारा ऐतिहासिक कोहोज किल्लय़ाचा समावेश आहे. दोनशे हेक्टरहून अधिक क्षेत्र असलेल्या या कोहोज किल्ला परिसरात लाखो संख्येने विविध प्रजातीमधील वनसंपत्ती आहे. मोठय़ा प्रमाणावर वन औषधी झाडेही आहेत. गेल्या चार दिवसांपासून लागलेल्या आगीत हजारो नव्याने लागवड केलेली तसेच वन औषधी वनसंपदा जळून खाक झाली आहे.

वाडा तालुक्यातील काही जंगलांमध्ये मोठय़ा संख्येने ससे, मोर, रानडुक्कर असे जंगली प्राणी आहेत. या प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारी जंगल पेटवितात असा आरोप वन कर्मचाऱ्यांकडून केला जातो. तर दरवर्षी वनविकास महामंडळ तसेच वनीकरण विभागाकडून मोठय़ा प्रमाणावर वृक्ष लागवड केली जात असल्याचे सांगितले जाते. ही लागवड प्रत्यक्षात होते कींवा नाही,की लागवडीचे पुरावे नष्ट करण्यासाठी या मानवनिर्मित आगी लावण्यात येतात असा आरोपही काही पर्यावरण प्रेमींकडून केला जात आहे. जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण वाढू लागल्याने येथील जंगली प्राणी, पक्षांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.

येथील जंगलाची राखण करण्यासाठी वन विभागाने महाराष्ट्र वनविकास महामंडळ यांच्यावर जबाबदारी दिली आहे. असे असतानाही येथील निम्म्याहून अधिक जंगलाला दरवर्षी आग लागत आहे. येथील वनविकास महामंडळाच्या वन अधिकाऱ्यांना या आगीसंदर्भात विचारणा केली असता आग लागलेले क्षेत्र आमच्या अखत्यारीत येत नाही असे बोलून जबाबदारी टाळली जात आहे, तर वनपरिक्षेत्र कंचाड येथील वनकर्मचाऱ्यांना विचारणा केली असता हे क्षेत्र वनविकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात असल्याचे सांगितले जाते.

आजपर्यंत एकही गुन्हा दाखल नाही

वाडा तालुक्यात वाडा पूर्व, वाडा पश्चिम व कंचाड असे तीन स्वतंत्र विभाग केलेले आहेत. तसेच वनविकास महामंडळ, वन्यजीव, अभयारण्य या विभागासाठी वर्ग दोनच्या पाच अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करुन शंभरहून अधिक कर्मचारी वर्ग नेमण्यात आलेला आहे. तसेच रोजंदारीवर काम करणारे शेकडो मजूर या कर्मचाऱ्यांच्या दिमतीला आहेत. तरीसुद्धा दरवर्षी पौष महिना संपला की माघ महिन्यात येथील जंगलांना आगी लागण्याचे प्रकार सुरू होतात. या आगी मानवनिर्मित असतानाही आजपर्यंत याबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नाही.

वन्य प्राण्यांचे शिकारी, चोरटी जंगल तोड करणारे जंगल तस्कर, तसेच वन कर्मचाऱ्यांचे वनाकडे झालेले दुर्लक्ष हीच कारणे जंगलातील आगी लागण्यास कारणीभूत आहेत.

– मनीष देहेरकर, पर्यावरणप्रेमी, वाडा.

ससे, मोर अशा प्राणी, पक्ष्यांची शिकार करणाऱ्यांकडूनच जंगलाला आगी लावण्यात येतात. वनविभागाकडून  कायम गस्ती सुरू असतात.

– एच.बी. फुलपगारे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वनविकास महामंडळ वाडा.