जिल्ह्यात सर्वत्र मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असताना बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दोन शिवसनिकांवर हल्ला केला. या प्रकारानंतर रात्री उशिरा सेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश कौडगे यांचे संपर्क कार्यालय जाळण्याचा प्रयत्न झाला. या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत काँग्रेसचे काही पदाधिकारी उघड पसेवाटप करीत होते. त्याला अटकाव केल्यानंतर दोन शिवसनिकांवर हल्ला झाला. या प्रकारानंतर शहरात अफवांचे पेव पसरले. पण पोलिसांनी वेळीच बंदोबस्त आवळल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
हा प्रकार यशस्वीपणे हाताळल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. पण रात्री साडेअकराच्या सुमारास सेनेचे जिल्हाप्रमुख कौडगे यांचे िहगोलीगेट परिसरातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न अनोळखी व्यक्तींनी केला. दोन दुचाकींवर आलेल्या चौघांनी कार्यालयाच्या शटरवर रॉकेल ओतले व पेटवून दिले. लगतच्या ट्रॅव्हल्स एजन्सीतील मुलाने तात्काळ कौडगे यांना माहिती दिली. वरिष्ठ पोलीस अधिकारीही घटनास्थळी धावले. आगीत शटरचे मोठे नुकसान झाले. आतील कागदपत्रे, साहित्य सुरक्षित राहिले. वजिराबाद पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला.
शिवसनिकांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिले. कार्यालय जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करावी. या भागातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. आरोपी अटक न झाल्यास सेना स्टाईल आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला. मनपा विरोधी नेते दीपकसिंह रावत, नगरसेवक विनय गुर्रम, बाळू खोमणे, बाळासाहेब देशमुख, बालाजी कल्याणकर आदींच्या या निवेदनावर सहय़ा आहेत.