पंढरपूर नगरपालिकेचे नगरसेवक संदीप पवार यांच्यावर गोळीबार करण्यात आला. शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या स्टेशन रोडवरील एका हॉटेलजवळ अज्ञात युवकांनी गोळ्या झाडल्याचा धक्कादायक प्रकार आज (दि.१८ मार्च) घडला. या घटनेनंतर पवार यांना त्वरीत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आज दुपारी एकच्या सुमारास पवार हे स्टेशन रोडवरील हॉटेलमध्ये आले असता, याठिकाणी आधीच दबा धरून बसलेल्या अज्ञात युवकांनी पवार यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात पवार गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्वरीत घटनास्थळी धाव घेत पवार यांना पोलिस व्हॅनमधूनच रुग्णालयात दाखल केले.

या घटनेनंतर शहरात तणावची स्थिती असून, सर्व व्यापारीपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. घटनेनंतर अप्पर पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासह पोलीस अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दरम्यान, या गोळीबारामागे नेमके काय कारण आहे याचा पोलीस तपास करत आहेत.