एक गंभीर जखमी ; टोळी युध्दातून घडलेल्या प्रकाराने खळबळ

दिवसाढवळ्या पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याने भुसावळमध्ये कायदा व सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत. खुनाच्या गुन्ह्य़ातील संशयितावर पोलिसांदेखत बुधवारी बसमध्ये गोळीबार झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेत एक जण गंभीर जखमी असून, हल्लेखोर फरार आहे. शहरात भडकलेल्या टोळी युध्दातून हा गोळीबार झाल्याचे म्हटले जात आहे.

माजी नगरसेवक मोहन बारसे यांच्या खून प्रकरणातील नथ्थू चावरिया, गोपाळ शिंदे हे संशयित धुळे कारागृहात होते. भुसावळ न्यायालयात हजर करण्यासाठी त्यांना पोलीस कर्मचारी बसने आणत असताना हल्ल्याची ही घटना घडली. हल्लेखोर याच बसमध्ये होता. बस शहरातील नहाटा चौफुलीजवळ थांबल्यावर हल्लेखोराने अचानक गोळीबार केला. त्यात नथ्थू चावरिया गंभीर जखमी झाला. हल्लेखोर घटनास्थळावरून दुचाकीने फरार झाला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच गदारोळ उडाला. बसमधील प्रवासी भयभीत झाले.

मोहन बारसेच्या खूनानंतर शहरात टोळीयुद्ध सुरू झाले असून, काही दिवसांपूर्वी याच संशयितांना न्यायालयात भेटण्यासाठी आलेल्या नंदु चावरिया व विनोद चावरीया यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता. त्यात नंदू चावरीयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुन्हा या गुन्ह्य़ातील संशयितांवर न्यायालयात साक्षीसाठी आणताना पोलिसांसमोर गोळीबार झाला. या प्रकरणी भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. संशयितांचा शोध घेणे सुरू असून, लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती पोलीस अधीक्षक जालिंदर सुपेकर यांनी दिली.