पालघर : विरार येथील रुग्णालयात झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांची अग्निसुरक्षा तपासणी (फायर ऑडिट) तसेच प्राणवायू वापराचे लेखा परीक्षण करण्याचे आदेश राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला दिले आहेत.

जिल्ह्यात नवीन करोना रुग्णालय उभारताना वेगवेगळ्या बाबींकडे लक्ष देणे अपेक्षित असताना काही बाबी प्रशासनाच्या पाहणीतून निसटल्याचे अपघातानंतरच्या पाहणी दरम्यान निदर्शनास आल्याने जिल्ह्याातील सर्व रुग्णालयांची अग्निसुरक्षा दृष्टिकोनातून पहाणी करणे तसेच प्राणवायू वापरासंदर्भात लेखापरीक्षण करण्याच्या सूचना राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

३१८६ रेमडेसिविर पुरवठा

जिल्ह्यात १७ एप्रिलपासून आजपर्यंत ३१८६ रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा जिल्ह्यातील ४३ खासगी रुग्णालयात करण्यात आला आहे. या रुग्णालयांमध्ये दाखल असलेल्या उपचाराधीन १४०० रुग्णांच्या प्रमाणात या इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालय तसेच अन्न व औषध प्रशासनाला अधिकाऱ्यांमार्फत करण्यात आले.