वाईहून पाचगणीला गॅस सिलिंडर घेऊन जाणा-या ट्रकच्या केबिनला पसरणी घाटात आग लागल्यानंतर ती ताबडतोब आटोक्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळला.  
वाईच्या भारत गॅसच्या बॉटलिंग प्लॅटमधून पाचगणीला गॅस सिंलिंडरची वाहतूक करणा-या सांगली गॅस सव्‍‌र्हिसच्या ट्रकला (एमएच १० झेड ११४९) च्या केबिनमधून अचानक धूर येऊ लागल्यामुळे चालकाने ताबडतोब वाई पोलीस, भारत पेट्रोलियम कंपनीतील अधिका-यांना व वाई पालिकेला अग्निशामकासाठी फोन केला. तत्काळ सर्व यंत्रणा उपलब्ध झाल्यामुळे मोठा अनर्थ टळला. भारत पेट्रोलियमच्या अधिका-यांनी आग प्रतिबंधक फवारणी करून आग आटोक्यात आणली. ही घटना वाई-पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात बुंवासाहेब मंदिराजवळ घडली. या वेळी वाईचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, भारत पेट्रोलियमचे व्यवस्थापक सत्यम नायर, अरविंद स्टोअर्सचे अरविंद पोरे व मदन पोरे सहायक पोलीस निरीक्षक नाना खरात आदी अधिकारी व वाई अग्निशामक अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, दोन तास वाई-पाचगणी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.