धावत्या आराम बसला राष्ट्रीय महामार्गावर आग लागण्याचा प्रकार शनिवारी घडला. यामध्ये संपूर्ण बस जळून खाक झाली. लग्न समारंभाकरिता गेलेले ३५ प्रवाशी सुखरूप आहेत. बसचालकाची सावधानता, अग्निशमन दलाचे प्रयत्न व टोल कर्मचाऱ्यांची मदत यामुळे आग आटोक्यात आली.    
पुणे येथे लग्न समारंभ आटोपून एक खासगी आराम बस (एम.एच.२२-बी.४८८४)  बेळगावकडे निघाली होती. शांतादुर्गा ट्रॅव्हल्स् कंपनीच्या या बसमध्ये ३५ प्रवाशी होते. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील किणी टोल नाक्याजवळ ही बस आली, तेंव्हा बसमधून धूर येऊ लागल्याचे वाहन चालकाच्या लक्षात आले. त्याने सतर्कता दर्शवित बस रस्त्याकडेला घेतली. घटनेची कल्पना त्याने प्रवाशांना दिली. त्यासरशी प्रवासी बसमधून बाहेर धाव घेत सुरक्षित ठिकाणी गेले.    
थोडय़ाच वेळात बसला आग लागली. बसमधील ज्वलनशील घटकामुळे आग भडकत गेली. आगीचे मोठमोठे लोळ पाहून प्रवाशी भेदरले, तर लहान मुलांनी हंबरडा फोडला. बसला आग लागल्याचे पाहून टोल नाक्यावरील कर्मचारी मदतीसाठी धावले. याचवेळी राष्ट्रीय महामार्ग पोलीस गस्त घालत असतांना घटनास्थळी आले. त्यांनीही मदतीसाठी हात पुढे केला. पाठोपाठ वडगाव नगरपालिका व कोल्हापूर महापालिकेचे अग्निशमन दल दाखल झाले. त्यांनी तासाहून अधिक काळ पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत आगीच्या वेढय़ामध्ये बस जळून खाक झाली होती. राष्ट्रीय महामार्गावरच बसने पेट घेतल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. वाहतुकीची दीर्घकाळ कोंडी झाली होती. पोलीस निरीक्षक चंद्रकांत शेंडगे, संजू पाटील व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.