रांगोळी (ता. हातकणंगले) येथील उसाच्या फडाला शनिवारी मोठी आग लागली. या आगीत सुमारे १०० ते १२५ एकर ऊस जळून खाक झाला आहे. आगीचे तांडव सुमारे पाच तासाहून अधिक काळ सुरू होते. जवाहर साखर कारखाना व रांगोळी ग्रामस्थांनी आग काबूत आणण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आगीची तीव्रता मोठी असल्याने सारे प्रयत्न व्यर्थ ठरले. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
पंचगंगा नदीकाठी असलेल्या रांगोळी गावामध्ये ऊस शेती मोठय़ा प्रमाणात आहे. नदीकाठी असलेल्या बेसकट नावाच्या भागात शनिवारी १२ वाजण्याच्या सुमारास उसाच्या फडाला आग लागली. कडक उन्हामुळे आग आजूबाजूच्या ऊस फडाकडे सरकत गेली. काही अवधीतच सुमारे १०० ते १२५ एकर उसाला आग लागली. याचवेळी या परिसरात उसाची तोड सुरू होती. तसेच काही शेतकरीही शेतात काम करीत होते. त्यांनी आरडाओरडा केल्याने लोक जमा झाले. काहींनी मोबाईलवरून ग्रामस्थांना संपर्क साधल्यावर ते मोठय़ा संख्येने घटनास्थळी दाखल झाले. या सर्वानी आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण आगीने रौद्ररूप धारण केले असल्याने तिला काबूत ठेवणे कठीण जात होते. घटनास्थळी जवाहर साखर कारखान्याचा बंब दाखल झाला. मात्र आगीच्या ठिकाणी जाण्यास चांगला रस्ता नसल्याने तो मधेच अडकून पडला. तेथूनच पाण्याचा मारा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमारे साडेपाच तासाहून अधिक काळ आग भडकली होती.
या आगीमध्ये आप्पासाहेब देसाई, रावसाहेब देसाई, बंडोपंत मोरे, मनोहर मोरे, चवगोंडा पाटील, बसगोंडा देसाई, सुरेश देसाई, अनिल मोरे आदींसह ३० ते ४० शेतकऱ्यांची ऊस शेती खाक झाली. आगीमुळे १०० ते १२५ एकरातील ऊस जमीनदोस्त झाला. घटनास्थळी, जवाहर, दत्त, गुरुदत्त आदी साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींनी हजर राहून आपापल्या नोंदीच्या ठिकाणच्या जळलेल्या उसाची तपासणी केली. जळलेला ऊस प्राधान्य क्रमाने तोडणीसाठी घेतला जावा अशी मागणी शेतकऱ्यांतून होत होती. टनामागे सुमारे २०० ते ५०० रुपये कपात होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. आगीमध्ये मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असले तरी नुकसानीचा नेमका आकडा मात्र समजू शकला नाही.