दिवाळीच्या आनंदात फटाके फोडताना ध्वनिप्रदूषणाच्या मर्यादेचे भान ठेवले जात नसल्याने भारतात दरवर्षी लाखो पक्षी, कीटकांचा अकाली मृत्यू होत आहे. दिवाळीच्या काळात सायंकाळी सहा ते रात्री १० या वेळेत ध्वनिप्रदूषणाचा स्तर सामान्य स्तरापेक्षा ४४ टक्के अधिक वाढतो. व्यावसायिक भागात ६५ डेसिबल्स, औद्योगिक भागात ७५ ते ८५ डेसिबल्स आणि निवासी भागांसाठी ५५ डेबिबल्सची ध्वनिमर्यादा घालून देण्यात आली आहे. ध्वनिप्रदूषणाचा परिणाम मानवजातच नव्हे तर पशु-पक्षी-कीटकांवरही होत आहे.
कानठळ्या बसविणाऱ्या आवाजामुळे पशु-पक्षी नवा आसरा शोधू लागतात. त्यांच्या मनात भीती दाटून येते. कधी कधी अतिताणामुळे त्यांचा हृदयविकाराने मृत्यूदेखील घडून येतो. दिवाळीच्या दहा दिवसात या घटनांत दरवर्षी वाढ होते. फटाक्यांपासून निघणाऱ्या धूराचे दुष्परिणाम पशु-पक्ष्यांवर होत आहेत. त्यांना श्वसनाचा त्रास होतो. फटाक्यांमुळे माणसे आनंद लुटत असली तरी पर्यावरणीय हानी होण्याचे प्रमाण त्यापेक्षा प्रचंड मोठे आणि धोकादायक आहे. एका वृत्तवाहिनीने केलेल्या अभ्यास सर्वेक्षणानुसार शिवकाशीतील फटाका कारखान्यांमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यात फटाक्यांचे उत्पादन दहा पटींनी वाढविले जाते. यासाठी १५ वर्षांखालील हजारो मुलांना कारखान्यात कामाला जुंपले जाते. उत्पादनाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मजबूर मुलांकडून १५-१५ तास काम करवून घेतले जाते. त्यासाठी अवघी १५ रुपये मजुरी दिली जाते. प्रकाश फेकणारे फटाके पक्ष्यांच्या डोळ्यांवर अत्यंत विपरित परिणाम करतात. अतितीव्र प्रकाशामुळे पक्ष्यांना आंधळेपणा येतो. अंधारात चाचपडत भिंतीवर आदळून त्यांचा मृत्यू होते. एका अभ्यासानुसार समुद्रातील कासव तीव्र प्रकाशाकडे आकर्षित होऊन पाण्याबाहेर पडतात. रस्त्यावरून जाताना त्यांचा वाहनांखाली सापडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढते. पशु-पक्ष्यांची ध्वनी ऐकण्याची क्षमता मानवजातीपेक्षा सात पटींनी अधिक असते. याचा अर्थ फटाक्यांच्या आवाजाने त्यांच्या कानाचे काय होत असेल, याचा विचार केला जात नाही. आवाजाने पक्ष्यांच्या कानाच्या नसा तुटण्याचीदेखील शक्यता वर्तविण्यात येते. पक्षी, कुत्री आणि मांजरी सुरक्षित जागा शोधण्यासाठी धावू लागतात. त्यांना मानसिक ताण येतो. त्यांची मनस्थिती भ्रमिष्टासारखी होऊन त्यांचे वागणे विचित्रासारखे होते. निसर्गाने निर्माण केलेले हे सुंदर पक्षी मरणाच्या दारात येऊन पडतात.
हवेतील धुरामुळे ३० दशलक्ष लोक दिवाळीनंतर अस्थमाचे शिकार होतात. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत साऱ्यांनाच याचा फटका बसतो. पशु-पक्ष्यांच्या फुफ्फुसातही प्रदूषित हवेमुळे श्वसनात अडथळे निर्माण होतात.
फटाके पाण्यात पडल्यानंतर पाण्यातील जलचरांवरही विपरित परिणाम होतो. फटाक्यांमधील रसायने, विषाक्त घटक यामुळे जलचरांचे किडनी आणि यकृत निकामी होण्याची शक्यता असते. चेन्नईतील १३ टक्के चिमण्या दर दिवाळीत ध्वनिप्रदूषणामुळे मरण पावतात. त्यामुळे स्वयंसेवी संघटनांनी आता फटाक्यांविरुद्ध देशव्यापी मोहीम उघडली आहे. यंदा याला मोठे यश मिळेल, असा अंदाज आहे.