न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन

न्यायालयाने रात्री ८ ते १० या वेळेत दिलेली फटाके वाजविण्याची मुभा संपल्यानंतरही आतषबाजी सुरूच ठेवण्यासह अंगावर फटाका उडून जखमी झाल्याप्रकरणी आलेल्या तक्रारी आदींवरून बारा जणांविरुद्ध औरंगाबाद शहरातील वेगवेगळय़ा पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांनी दिली. तर छावणी पोलीस ठाण्यात वाजवलेला फटाका अंगावर उडून जखमी झाल्याप्रकरणी एका अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्सूल परिसरातील जटवाडा रोडवरील सारा वैभव समोर ७ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास एक जण फटाके वाजवत होता. या वेळी गस्तीवर असलेल्या हर्सूल पोलिसांची गाडी पाहून फटाके वाजविणाऱ्या इसमाने धूम ठोकली. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार कल्याण चाबुकस्वार यांनी दिलेल्या तक्रारीवरून फटाके वाजविणाऱ्या व्यक्तीविरुद्ध हर्सूल ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या घटनेत, जिन्सी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जिन्सी चौकात १० नोव्हेंबर रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास एक जण फटाके वाजवत होता. त्या वेळी जिन्सी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी फटाके वाजविणाऱ्या व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पसार झाला. या प्रकरणी जिन्सी ठाण्याचे सहायक फौजदार आयुब खान उस्मान खान पठाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून फटाके वाजविणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिन्सीसह मुकुंदवाडी अशा वेगवेगळय़ा आठ पोलीस ठाण्यात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करीत रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मुकुंदवाडीत पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक नाथा जाधव यांनी दिली.

फटाका उडून जखमी

छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या कर्णपुरा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका कुटुंबातील मुलाच्या अंगावर परिसरात वाजवण्यात येत असलेला फटाका उडाला. यात तो मुलगा जखमी झाला. या प्रकरणी जखमी मुलाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एका अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांनी दिली.