दुचाकीने धडक का दिली या कारणावरून तलवार, सळया घेऊन जमावासह विचारणा करणा-यासाठी चाल करुन येणा-या दोघांवर रायफलमधून गोळीबार करण्याचा प्रकार मिरज तालुक्यातील संतोषवाडी येथे घडला. या गोळीबारात दोघेजण जखमी झाले असून मिरज पंचायत समितीच्या माजी सभापतीच्या भावासह तिघांना अटक करण्यात आली आहे.
हणमंतराव वसंतराव गायकवाड (५०) हे मोटरसायकलने धडक दिल्याने पडले होते. या बाबत संतोषवाडी येथील भाऊसाहेब उर्फ साहेबराव राजेराव जगताप (५७) विचारणा करण्यासाठी गेले होते. साहेबराव जगताप यांची दोन मुले अभिजित व विश्वजित यांनी गायकवाड यांना मोटरसायकलने धडक देऊन पाडले होते. गायकवाड हे दिगंबर श्रीपतराव जाधव यांच्यासह ८ ते १० लोकांना सोबत घेऊन गेले होते. या वेळी त्यांच्याकडे तलवार, चाकू, लोखंडी सळ्या ही हत्यारे होती. यावेळी दोघांच्यात वादावादी झाल्यानंतर जगताप यांनी हणमंतराव गायकवाड यांच्यावर रायफलमधून गोळीबार केला. तर मध्यस्थी करण्यास आलेल्या दिगंबर जाधव यांना बंदुकीच्या दस्त्याने मारले. यात दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर वॉल्नेस रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी साहेबराव जगताप व त्यांची मुले अभिजित व विश्वजित यांना अटक करण्यात आली असून न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. साहेबराव जगताप यांनी परवान्याची रायफल निवडणूक आचारसंहितेमुळे ग्रामीण पोलीस ठाण्यात जमा केली असून गोळीबारासाठी वापरलेली रायफल वेगळीच असल्याचे सांगण्यात आले.