शहरात कडक टाळेबंदीची अमलबजावणी सुरू असतांनाही उस्मानिया पार्क परिसरात गुरूवारी सायंकाळी दोन जणांच्या वादात हवेत गोळीबार करणाऱ्या चार मद्यपींना शहर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गावठी बंदुका हस्तगत करण्यात आल्या आहेत. माजी महापौर अशोक सपकाळे यांच्या मुलासह इतर तिघांविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

करोना रूग्णसंख्येत होणारी वाढ रोखण्यासाठी शहरात कडक टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. असे असतांनाही उस्मानिया पार्क परिसरात एका विहिरीजवळ संशयित राजू उर्फ बाबू सपकाळे (३०, रा. क्रांती चौक, शिवाजी नगर), मिलिंद सकट (२७, रा. गेंदालाल मिल), मयूर उर्फ विकी अलोणे (२६, रा.आर.वाय. पार्क) आणि इम्रान उर्फ इमु शहा रशिद शहा (२८, रा. गेंदालाल मिल) हे चौघे सायंकाळी सहाच्या सुमारास बियर पीत बसले होते. त्यावेळी दोन जण त्यांच्या समोरून जात असतांना मयूरने कुठे जात आहात, अशी विचारणा केल्याने दोघांत वाद झाला. वादाचे रूपांतर थोडय़ा वेळात हाणामारीत झाले. भांडण सोडविण्यासाठी सुफियान शकील बेग मिर्झा (२२, रा. शिवाजीनगर, हुडको) हा मध्यस्थी करत असतांना मयूरने बियरची फेकलेली बाटली सुफियानच्या उजव्या डोळ्याला लागल्याने जखम झाली. मयूरने त्याच्याजवळ असलेल्या गावठी कट्टय़ातून हवेत गोळीबार केला. आणि चौघे जण पळाले. हाणामारी आणि गोळीबारही झाल्याची माहिती मिळाल्याने पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलाभ रोहन हे निरीक्षकांसह उस्मानिया पार्क परिसरात रात्री उशिरापर्यंत ठाण मांडून होते. संशयित राजू सपकाळे हा माजी महापौर अशोक सपकाळे यांचा मुलगा आहे. राजू आणि मिलिंद सकट यांना गुरूवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर इम्रान आणि मयूर हे शिरसोली येथे असल्याची माहिती मिळाली. पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी पथक तयार करून शिरसोली येथे रवाना केले. शुक्रवारी पहाटे दोन वाजता शिरसोलीतून संशयित विक्की उर्फ मयूर अलोणे आणि इम्रान शहा यांना अटक करून त्यांच्या ताब्यातून दोन गावठी बंदुका ताब्यात घेतल्या. शहर पोलिसात चौघांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

बालिकेवर अत्याचार

जळगाव शहरात टाळेबंदी असतांना एकिकडे गोळीबाराची तर दुसरीकडे मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी संकुलात १० वर्षांच्या बालिकेवर अत्याचार होत असल्याने कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. शुक्रवारी दुपारी गोलाणी संकुलाजवळ पीडित बालिका उभी असतांना खाऊ देण्याचे आमिष दाखवित संशयिताने संकुलाच्या तिसऱ्या मजल्यावर नेले. त्या ठिकाणच्या प्रसाधनगृहात बालिकेवर अत्याचार करण्यात आला. पीडित बालिकेने आजीला सर्व घटना सांगितल्यावर शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली.