सात जणांना ठार करणाऱ्या वाघाला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार मारण्याची घटना हा एक अपघात होता, असे स्पष्टीकरण राज्याचे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी शुक्रवारी सांगलीत दिले. केवळ स्वतःच्या सुरक्षेसाठी नेमबाजांनी या वाघावर गोळीबार केल्याचे कदम यांनी स्पष्ट केले. दरम्यान, कदम यांच्या वक्तव्यामुळे या संपूर्ण घटनेला नवे वळण मिळाले आहे.
नरभक्षक ‘ठरवून’ वाघाची हत्या
सांगलीमध्ये पत्रकार परिषदेत पतंगराव कदम यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा परिसरात घडलेल्या घटनेबद्दल राज्य सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले, ठार मारण्यात आलेला वाघ नरभक्षक होता की नाही, हे अजून सिद्ध झालेले नाही. त्या वाघाच्या पोटातील मांस तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. तपासणीनंतर त्यांच्या पोटात माणसाच्या शरीराचे घटक होते की नाही, हे स्पष्ट होईल. मात्र, या वाघाला मारण्याचा प्रकार हा केवळ एक अपघात होता. नेमबाजांनी स्वसंरक्षणार्थ वाघावर गोळीबार केल्याचे त्यांनी सांगितले.
मृत वाघाच्या मेंदूची हैदराबादमध्ये तपासणी
पोंभुर्णा परिसरात एक वाघीण व तिच्या दोन पिल्लांनी तीन महिन्यांत सात लोकांचे बळी घेतले. गेल्या रविवारी वाघाने एका गावकऱ्याला ठार केल्यानंतर वाघाला ठार केले नाहीत तर आम्हीच मारू, अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली. येथील राजकीय नेत्यांनीही ही मागणी पूर्ण करण्याचा आग्रह धरल्याने प्रधान मुख्य वनसंरक्षक सर्जन भगत यांनी रविवारी वाघाला नरभक्षक ठरवून गोळ्या घालण्याचे आदेश दिले. नरभक्षक ठरवून जिल्ह्य़ात घेतला गेलेला वाघाचा हा दुसरा बळी आहे. यापूर्वीही चंद्रपुरातच ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत तळोधी येथे वाघाला अशाच प्रकारे नेमबाजांकडून ठार करण्यात आले होते.