15 August 2020

News Flash

गंगा नदीवर मराठीतील पहिले पुस्तक नांदेडमधील लेखकद्वयांच्या नावावर

गोदाकाठी वसलेल्या नंदिग्रामनगरातील चंद्रकला व एल. के. कुलकर्णी या निवृत्त शिक्षक दाम्पत्याने तीन-चार वर्षे अभ्यास करून व वेगवेगळय़ा माध्यमांद्वारे पूरक माहिती जमवून संयुक्तपणे लिहिलेल्या, तसेच

| August 9, 2015 01:20 am

गोदाकाठी वसलेल्या नंदिग्रामनगरातील चंद्रकला व एल. के. कुलकर्णी या निवृत्त शिक्षक दाम्पत्याने तीन-चार वर्षे अभ्यास करून व वेगवेगळय़ा माध्यमांद्वारे पूरक माहिती जमवून संयुक्तपणे लिहिलेल्या, तसेच राजहंस प्रकाशनाने साकारलेली लेखनकृती गंगा नदीवरील मराठीतील पहिले परिपूर्ण पुस्तक असा मान मिळवला आहे.
शुक्रवारची सकाळ नेहमीसारखी उगवली, पण या दिनाची प्रसन्न दुपार शहराच्या भाग्यनगरात राहणाऱ्या कुलकर्णी दाम्पत्यास आंतरिक समाधान देऊन गेली. शहरात अनेक पुस्तकांचे प्रकाशन समारंभ लहानमोठय़ा प्रमाणात होत असतात, पुढेही होतील. पण अशा समारंभातून व्यक्त होणाऱ्या आनंदापेक्षाही मोठा आनंद पुस्तक हाती पडल्याच्या क्षणी लेखकद्वयांना देऊन गेला.
‘राजहंस’ने आपल्या रिवाजानुसार ‘गंगा तुझ्या तीराला’ या नव्या कोऱ्या पुस्तकाच्या दोन प्रती-पेढय़ांचा पुडा लेखकद्वयांकडे दोन दिवसांपूर्वीच रवाना केला. हे पार्सल चंद्रकला व एल. के. कुलकर्णी यांना शुक्रवारी दुपारी प्राप्त झाले. एल. के. सरांच्या कन्या अपर्णा, भगिनी अलकाताई, मेहुणे सु. मा. कुलकर्णी, लेखक भगवंत क्षीरसागर, विविध विषयांचे अभ्यासक सुरेश जोंधळे, छायाचित्रकार राघवेंद्र कट्टी, ‘अभंग’चे उमेश कस्तुरे आदी निकटवर्तीय पटापट तेथे एकत्र आले आणि तेही आनंदोत्सवात सामील झाले.
भूगोलकोश या मौलिक ग्रंथामुळे एल. के. यांचा लेखक म्हणून दबदबा सर्वदूर पसरला. या पुस्तकनिर्मितीत चंद्रकला यांनी त्यांना तोलामोलाची साथ दिली. त्याच काळात चंद्रकला यांना नद्यांवरच्या अभ्यासाने प्रेरित केले. गंगा-यमुना या नद्यांवर शंभर-सव्वाशे पानांचे पुस्तक लिहावे, अशी त्यांची योजना होती, पण पुढे एल. के. यांच्या सहभागामुळे त्याचा विस्तार होत होत छोटेखानी पुस्तकाचे मोठय़ा ग्रंथात रूपांतर झाले. या निर्मितीतील काही प्रसंग त्यांनी कथन केले. गंगा नदीला मोठी परंपरा आहे, परंतु तिच्यावर भारतीय भाषांमध्ये सर्वागांनी विपुल लेखन झाले नाही. हिंदी भाषेत दोन जुजबी पुस्तके आहेत. या पाश्र्वभूमीवर कुलकर्णी दाम्पत्याने मराठी वाचकांसाठी परिपूर्ण पुस्तक दिल्याने ‘राजहंस’ने त्याच्या निर्मितीत कोणतीही कसर ठेवली नाही. पुस्तकाचे रूप बघितल्यावर परिश्रमाचे चीज झाले, अशीच या दाम्पत्याची भावना दिसून आली.
लेखक-प्रकाशन यांचे नाते जसे अतूट, तसे ते वेगवेगळय़ा पातळय़ांवर बदलतही असते.. ‘राजहंस’चे दिलीप माजगावकर प्रकाशक-लेखक आहेतच, पण अत्यंत चिकित्सक वाचकही आहेत. कुलकर्णी दाम्पत्यास त्यांनी केवळ पुस्तकांच्या प्रती आणि पेढय़ाचा पुडाच नाहीतर त्यासोबत त्यांचे अभिनंदन करणारे, त्यांच्या लेखनकृतीस दाद देणारे, ‘सलाम’ करणारे विस्तृत पत्रही पाठवले. सोबत स्वामित्वधनाचे दोन स्वतंत्र धनादेशही होते, पण कुलकर्णी दाम्पत्य धनादेशाकडे पाहून नव्हे, तर त्या पात्रामुळे कृतार्थ झाले, श्रीमंत झाले.. न बोलताही त्यांची ही भावना उपस्थितांच्या लक्षात आली. समारंभीय थाट, उत्सवी वातावरण नि गर्दी नसतानाही एका कौटुंबिक कार्यक्रमाने ‘गंगा आली दारी’ असे चित्र तेथे साकारले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2015 1:20 am

Web Title: first book on ganga river by two writer in nanded
टॅग Nanded
Next Stories
1 मराठी जगत : ओडिया कादंबरीचा मराठी अनुवाद प्रकाशित
2 मालेगावात गुंडाची गोळी घालून हत्या
3 कृत्रिम पावसासाठी दोन टप्प्यांत फवारणी
Just Now!
X